मुंबई : सरकारी रुग्णालयांतील परिचारिकांची रिक्त पदे तातडीने भरणे, कंत्राटी पद्धतीने परिचारिकांची भरती करू नये आदी विविध मागण्यांसाठी गुरुवारी राज्यातील ३० हजार परिचारिकांनी ‘काम बंद’ आंदोलन पुकारले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे रुग्ण सेवेवर फारसा परिणाम झाला नाही. मात्र काही रुग्णालयांमधील मोजक्याच शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या.
सरकारी रुग्णालयातील परिचारिका आपल्या विविध मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन करीत आहेत. मात्र त्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अखेर गुरुवारी या परिचारिकांनी ‘काम बंद’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबईतील जे.जे., सेंट जॉर्जेस, जी.टी. व कामा या सरकारी रुग्णालयांतील परिचारिकांनी ‘काम बंद’ आंदोलन केले. परिचारिकांच्या ‘काम बंद’ आंदोलनाची दखल घेऊन रुग्णालय प्रशासनाने रुग्ण सेवा बाधित होणार नाही यादृष्टीने उपाययोजना केल्या. रुग्णालयातील शिकाऊ परिचरिका व वरिष्ठ श्रेणी असलेल्या परिचारिकांची रुग्ण कक्ष व शस्त्रक्रियागृहामध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे रुग्ण सेवेवर फारसा परिणाम झाला नाही.
रुग्ण कक्षामध्ये शिकाऊ परिचारिका आणि शस्त्रक्रियागृहामध्ये वरिष्ठ परिचारिकांची नियुक्ती करण्यात आल्याने दैनंदिन कामावर फारसा परिणाम झाला नाही. परिचारिका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींना रुग्ण कक्ष हाताळण्याची सवय असल्याने त्यांनी व्यवस्थित जबाबदारी पार पाडली. तसेच काही सामाजिक संस्थांची यासाठी मदत घेण्यात आल्याने रुग्ण सेवेवर फारसा परिणाम झाला नाही, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिली. तसेच काही लहान शस्त्रक्रिया वगळता कोणतीही नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच संप कायम राहिल्यास योग्य नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
रुग्णालयातील शिकाऊ परिचारिकांच्या मदतीने रुग्ण सेवा सुरळीत ठेवण्यात आली आहे. प्रत्येक रुग्ण कक्षामध्ये शिकाऊ परिचारिकांची तीन पाळ्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र परिचारिकांअभावी तीन शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली.
परिचारिकांच्या संपाची दखल घेऊन आम्ही बुधवारीच तिन्ही पाळ्यांमध्ये शिकाऊ परिचारिकांची नियुक्ती केली होती. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया विभागामध्ये कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतल्याने फारसा परिणाम झाला नाही. दरम्यान, परिचारिकांचा संप कायम राहिल्यास आम्ही गुरुवारप्रमाणे नियोजन करून रुग्ण सेवा बाधित होणार नाही याची काळजी घेऊ, अशी माहिती जी. टी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जीतेंद्र संकपाळ यांनी दिली.