मुंबई : असह्य उकाडय़ावर उतारा म्हणून बहुतेक प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करण्यास पसंती देत आहेत. सध्या दरमहिना वातानुकूलित लोकलमधून १३ ते १५ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. तर १ जानेवारी ते आजवर मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमधून सुमारे ७२ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेला सुमारे ३२.७२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.   

मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या दररोज ५६ फेऱ्या चालविण्यात येत आहेत. या लोकलमधून दररोज सुमारे ५० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. वर्षभरापूर्वी वातानुकूलित लोकलचे तिकीट भाडे कमी केल्यानंतर प्रवाशांचा प्रवास किफायतशीर झाला आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत आहे. उन्हाळय़ाच्या दिवसात प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून वातानुकूलित लोकलमधून दरमहिना १५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत.

  • ०१.०५.२०२३ ते ३१.०५.२०२३ पर्यंत (अपेक्षित प्रवासी)
  •   प्रवासी संख्या (लाखांमध्ये)  १६.००
  •   महसूल (कोटींमध्ये)          ७.५०
  •   दैनिक सरासरी (प्रवासी)    ६००००