मुंबई : वडाळा बस डेपो परिसरात दोन भावांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये ३२ वर्षीय निखिल लोणधे याचा मृत्यू झाला. रघुनाथ महाडिक रोडवरील पदपथावर हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्पेश कुडतरकर (२९) आणि योगेश कुडतरकर (३१) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

दारूच्या नशेत वाद झाल्यामुळे आरोपींनी हा हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले. मृत निखिल व आरोपी दोघेही एकमेकांचे जुने मित्र होते, तसेच तिघांविरोधात आधीपासून गुन्हे दाखल आहेत. घटनेनंतर अवघ्या १५ मिनिटांतच रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलिसांच्या मोबाइल पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमाखाली हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. यापूर्वी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी मृत निखिलचा भाऊ वर्धन हा आईसोबत फुटपाथवर झोपला होता. त्यावेळी वेगात आलेल्या मोटरगाडीखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.