मंगल हनवते
मुंबई : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गालगत दुतर्फा ११ लाख ३५ हजार झाडे, तसेच २२ लाख झुडुपे आणि वेली लावण्यात येणार आहेत. यासाठीच्या १३ निविदा अंतिम झाल्या आहेत. त्यामुळे वृक्षारोपणाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच टप्प्याटप्प्यात कामास सुरुवात करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे.
समृद्धी महामार्गासाठी ७०० किमीच्या मार्गात मोठय़ा संख्येने झाडे तोडण्यात आली. हा आकडा अद्याप स्पष्ट नाही, मात्र दीड लाखांहून अधिक झाडे या प्रकल्पासाठी तोडल्याची शक्यता वर्तविली जात आहे. झाडांच्या मोबदल्यात काही निश्चित झाडे लावणे बंधनकारक आहे. त्यानुसार समृद्धी महामार्गासाठी कापण्यात आलेल्या झाडांच्या मोबदल्यात महामार्गात दुतर्फा ११ लाख झाडे आणि २२ लाख झुडुपे, वेली लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यासाठी एमएसआरडीसीकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. महामार्गाचे बांधकाम १५ पॅकेजमध्ये सुरू असून या १५ पॅकेजनुसार वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेत एमएसआरडीसीने १५ निविदा काढल्या होत्या. या १५ पैकी १३ निविदा अंतिम करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
समृद्धी महामार्गासाठी कापण्यात आलेल्या झाडांमुळे त्याचा पर्यावरणावर मोठा परिणाम झाल्याचा आरोप होत आहे. तसेच वृक्षारोपण रखडल्याने त्यावरही नाराजी व्यक्त होत होती. मागील कित्येक वर्षांपासून केवळ निविदा प्रक्रिया आणि पर्यायाने वृक्षारोपण रखडले होते. आता निविदा अंतिम झाल्या आहेत. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनीही निविदा अंतिम झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. लवकरच ज्या टप्प्यात काम पूर्ण झाले आहे, त्या टप्प्यात वृक्षारोपण कामाला सुरुवात करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे.
निविदेनुसार एकूण कंत्राट सात वर्षांचे असून दोन वर्षे वृक्षारोपणाचे काम पूर्ण करण्यासाठी आहेत. तर पाच वर्षे कंत्राटदारावर झाडांच्या देखभालीची जबाबदारी असणार आहे. अंदाजे ७०० कोटी रुपये खर्च करुन हे वृक्षारोपण केले जाणार आहे. ९८ टक्के तरी झाडे जगतील, अशाप्रकारे वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतरच कंत्राटदारांना त्यांची रक्कम देण्यात येणार असल्याचे निविदेत नमूद करण्यात आले आहे. त्या त्या वातावरणाचा, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करत झाडांची निवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तज्ज्ञांच्या सहभागातून हे वृक्षारोपण केले जाणार आहे.
