मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा दिसून आला. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून अकरा ऑगस्टपर्यंत लम्पी त्वचा रोगामुळे ३३९ गोवंशाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील २५ जिल्ह्यांत १०८२ बांधित क्षेत्रात उपचार सुरू आहेत. पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगावात सर्वाधिक प्रादुर्भाव आहे.
देशात पहिल्यांदा २०१९ आणि राज्यात गडचिरोलीत २०२२ मध्ये पहिल्यांदा लम्पीची लागण झाली होती. २०२२ मध्ये राज्यात सुमारे ३४ हजार गोवंशांचा लम्पीमुळे मृत्यू झाला होता. यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील एकूण २५ जिल्ह्यांत रोगाची लागण झाली आहे. त्यापैकी पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांत सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. २५ जिल्ह्यांत एकूण १०८२ बाधित क्षेत्रे असून, ९,९२८ जनावरे बाधित आहेत. उपचारानंतर ६६१८ जनावरे बरी झाली आहेत, तर ३३९ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
साथ आटोक्यात; खबरदारीची गरज
राज्यातील गोवंशीय पशूधनाची संख्या १.३९ कोटी आहे. २०२२ मध्ये लम्पीमुळे तब्बल ३४ हजार जनावरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ९३ टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. गोवंशीय पशूधनाची संख्या मोठी असल्यामुळे दररोज सुमारे ३८,००० जनावरांचा नैसर्गिक मृत्यू होत असतो. त्या तुलनेत ३३९ जनावरांचा मृत्यू ही अत्यंत कमी संख्या आहे. तरीही दुधाळ जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. लम्पीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण, औषध फवारणी, जनावरांच्या गोट्याची स्वच्छता, बाधित जनावरांचे विलगीकरण आणि बाधित परिसराचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.
लम्पी प्रतिबंधक लस पुढील वर्षी
देशात २०१९ पासून लम्पी बाधित जनावरांना गोट पॉक्स, या लसीचे लसीकरण करण्यात येते. यंदाही पशुसंवर्धन विभागाने पावसाळा पूर्व लसीकरणात लम्पी प्रतिबंधक गोट पॉक्स लसीच्या ११९ लाख लस मात्रा आणि लसीकरण साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. तत्कालीन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पुढाकार घेऊन पशुसवंर्धन विभागाच्या वतीने लम्पी प्रतिबंधक लसीची निर्मिती आणि उत्पादनाला चालना दिली होती. पुण्यातील भारतीय पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेने (आयव्हीबीपी) लम्पी स्कीन रोग प्रतिबंधात्मक लस निर्माण केली आहे. सध्या लसीची प्रत्यक्ष बाधित जनावरांवर चाचणी सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन जानेवारी २०२६ मध्ये लम्पी प्रतिबंधक लस उपलब्ध होईल, अशी माहिती पशूसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली.
पंधरा दिवसांत साथीचा संसर्ग थांबेल
राज्यातील लम्पी त्वचा रोगाची साथ आटोक्यात आहे. शेतकऱ्यांना घाबरू नये, काळजी घ्यावी. पुढील पंधरा दिवसांत साथीचा संसर्ग थांबेल. लहान वासरे आणि वृद्ध जनावरांना संसर्ग होत आहे. बाधित क्षेत्रातील सर्वच गोवंशीय जनावरांचे लसीकरण केले जात आहे. जानेवारी २०२५ मध्ये लम्पी प्रतिबंधक लस उपलब्ध होईल, अशी माहिती पशूसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली.