अँटॉप हिल येथे मोटारसायकल जाळण्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी घडला असतानाच आता करीरोड येथे तब्बल ३८ गाडय़ांना जाळण्याची घटना उघडकीस आले आहे. सोमवारी पहाटे झालेल्या या जाळपोळीच्या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये कमालीची घबराट पसरली असून नुकसान करणाऱ्या या गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. काळाचौकी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
करीरोड येथील महादेव पालव मार्गावर विघ्नहर्ता आणि सुखकर्ता या इमारती आहेत. इमारतीत राहणारे नागरिक त्यांची वाहने इमारतीमध्ये असलेल्या जागेत उभी करतात. सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास उभ्या असलेल्या गाडय़ांना आग लागल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले. नागरिकांनी तातडीने अग्निशमन दल आणि पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाने तातडीने या आगीवर नियंत्रण मिळवले. पण, तोपर्यंत ३४ मोटारसायकल आणि ४ कार जळाल्या होत्या. घटनेमुळे स्थानिकांमध्ये कमालीचे संतापाचे वातावरण असून पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा तपास सुरू असल्याचे काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप उगले यांनी सांगितले.