मुंबई : शीव उड्डाणपुलावर भरधाव वेगात धावणाऱ्या मोटारगाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ३६ वर्षीय सोहेल शकील अन्सारी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोटारगाडी चालक चंदुलाल जैन यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सोहेल अन्सारी आणि त्यांचा मित्र अबू फैजान एहसानुल हक अन्सारी कुर्ला येथील रहिवासी असून दोघेही रविवारी मरिन ड्राइव्हवरून त्यांच्या दुचाकीने घरी परतत होते.
शीव उड्डाणपुलावरून जात असताना त्यांच्या मोटारसायकलला विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारगाडीने धडक दिली. उड्डाणपुलावर दुभाजक नसल्यामुळे मोटारगाडी त्यांच्या समोर आली व त्यांना धडकली, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. अपघातात सोहेल अन्सारी गंभीर जखमी झाला. त्याच्या नाका-तोंडातून रक्त येऊ लागले. त्याला तातडीने शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या अपघातात त्याचा मित्र अबू फैजान हाही जखमी झाला असून त्याच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघात झाला त्यावेळी मोटारगाडी चंदुलाल जैन चालवत होता. चालक भायखळा येथील रहिवासी आहे. या प्रकरणी चंदुलाल जैन यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१) (दुर्घटनेत निष्काळजीपणामुळे मृत्यू), १२५ (ब) (इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणे), २८१ (निष्काळजीपणे वाहन चालवणे) आणि मोटार वाहन कायदा अंतर्गत कलम १८४ (भरधाव वेगाने वाहन चालवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावून सोडून दिले असून पुढील तपास सुरू आहे.
विरुद्ध दिशेने येऊन मोटरगाडीची धडक
मोटारगाडी चालक रस्ता सोडून दुसऱ्या वाहिनीमध्ये आला. त्यामुळे दुचाकीला मोटारगाडीने समोरून धडक दिली. अपघातात मृत्यू झालेला सोहेल दुचाकीवर मागे बसला होता. त्याच्या तोंडाला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो बेशुद्ध झाला होता. खासगी वाहनाने त्याला तातडीने रुगाणालयात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनस्थळाजवळ सीसी टीव्ही असून त्यात घटनेचे चित्रीकरण झाले आहे. काही कामानिमित्त ते दोघेही मरिन ड्राई्ह येथून चेंबूरच्या दिशेने जात होते. चेंबूरवरून ते घरी जाणार होते. पण त्यापूर्वीच अपघात झाला. जखमी व्यक्तीच्या पायाचे हाड मोडले आहे. दोघेही फार मित्र होते. मोटारगाडी चालक वयोवृद्ध असल्यामुळे त्याला नोटीस देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.