मुंबई : देशात गतवर्षाच्या तुलनेत खरीप पेरण्यांमध्ये ३८.४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भात पिकाच्या लागवडीत सर्वाधिक वाढ झाली आहे. त्या खालोखाल मका आणि उसाच्या लागवडीतही वाढीचा कल आहे. परंतु केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्यतेल मिशन राबवूनही तेलबियांची लागवड सात टक्क्यांनी घटली आहे.
देशाचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र १०९६.६५ लाख हेक्टर आहे. गतवर्षी ९५७.१५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, यंदाच्या खरीप हंगामात ११ ऑगस्टअखेर ९९५.६३ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत भाताच्या लागवडीत सर्वाधिक ३९.४५ टक्क्यांनी वाढ होऊन ३६४.८० लाख हेक्टरवर लागवड झाली आहे.
केंद्र सरकारने कडधान्य लागवडीला प्रोत्साहन दिले असले तरीही कडधान्य लागवडीत वाढ झाली नाही. एकूण १०६.६८ लाख हेक्टरवर कडधान्यांची लागवड झाली आहे. त्यात तूर ४०.८६ लाख हेक्टर, कुळीथ १७ हजार हेक्टर, उडीद २०.१५ लाख हेक्टर, मूग ३३.२१ लाख हेक्टर, मटकी ९.०६ लाख हेक्टर आणि अन्य कडधान्यांची ३.२४ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे.
अन्नधान्यांच्या लागवड १७८.७३ लाख हेक्टरवर झाली आहे. मका वगळता अन्य अन्नधान्यांच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. मक्याचे क्षेत्र ८.७४ टक्क्यांनी वाढून ९१.८९ लाख हेक्टरवर गेले आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र ७८.९५ लाख हेक्टर होते, गतवर्षी ८३.१५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. केंद्र सरकारने मक्यापासून इथेनॉल उत्पादनाला चालना दिल्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. पण, मक्याची लागवड वाढत असताना ज्वारी, बाजरी, नाचणीसह अन्य लहान तृणधान्यांच्या क्षेत्रात घट होताना दिसत आहे.
खाद्यतेल मिशन नंतरही तेलबियांचे क्षेत्र घटले
केंद्र सरकारने खाद्यतेलाची गरज देशाच पूर्ण व्हावी. खाद्यतेल आयात कमी व्हावी, यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची अंमलबजावणी सुरू केली आहे. तरीही खरीप हंगामात तेलबियांच्या लागवड क्षेत्रात घट झाल्याचे दिसून येत आहे. तेलबियांचे सरासरी क्षेत्र १९४.६३ लाख हेक्टर आहे. गतवर्षी १८२.४३ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा ६.८२ टक्क्यांनी घट होऊन १७५.६१ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात भुईमूगाची ४३.२३ लाख हेक्टर, तिळाची ८.८९ हेक्टर, सूर्यफुलाची ६१ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. सोयाबीनच्या दरात मोठी पडझड झाल्यामुळे सोयाबीनची लागवड ११९.५१ लाख हेक्टरवर स्थिरावली आहे. गतवर्षी १२४.२४ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, तर देशाचे सरासरी लागवड क्षेत्र १२७.१९ लाख हेक्टर आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात ४.७३ टक्क्यांनी घट झाली आहे.
ऊस लागवड वाढली, कापूस घटली
उसाच्या लागवडीत १.६४ टक्क्यांनी वाढ होऊन ५७.३१ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. गतवर्षी ५५.६८ लाख हेक्टरवर लागवड झाली होती, सरासरी क्षेत्र ५२.५१ लाख हेक्टर आहे. उसाच्या लागवडीत वाढ झाल्यामुळे आगामी गळीत हंगामात उसाची उपलब्धता चांगली राहणार आहे. कापूस लागवडीतही ३.५३ टक्क्यांनी घट झाली आहे. १२९.५० लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. गतवर्षी ११०.४९ लाख हेक्टरवर, तर यंदा १०६.९६ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. दरातील पडझड आणि लाल बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादकांना आर्थिक फटका बसला आहे. त्याचा परिणाम लागवडीवर दिसून आला आहे.