लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) २०२२-२३ या कालावधीत तब्बल ४० प्राणी पक्षी दगावले असल्याचे वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने प्रकाशित केलेल्या या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी वॉचडॉग फाऊंडेशन या संस्थेने केली आहे. दरम्यान प्राण्यांचे मृत्यू हे नैसर्गिक पद्धतीने त्यांच्या वयानुसार झाले असून मृत्यूदर वाढला नसल्याचा दावा प्राणी संग्रहालय प्रशासनाने केला आहे.

भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयात २०२२-२३ या कालावधीत विविध जातीच्या ४० प्राणी व पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे वार्षिक अहवालातून उघड झाले आहे. हा अहवाल केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण (सीझेडए)ने प्रकाशित केला आहे. या प्रकरणी लक्ष घालून मृत्यू दर वाढला आहे का, इतके प्राणी का मेले, कशाने मेले याची चौकशी करण्याची मागणी वॉचडॉग फाऊंडेशनने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. या स्वयंसेवी संस्थेचे पिमेंटा गॉडफ्रे आणि निकोलस अल्मेडा यांनी सीझेडएला देखील पत्रही लिहिले आहे. मृत प्राण्यांमध्ये नष्ट होत असलेल्या प्रजातींचाही समावेश असल्याचा आरोप फाऊंडेशनने केला आहे. या अहवालानुसार अनेक प्राणी हे हृदयविकाराचा झटका आल्यामुळे, श्वासोच्छवासास अडथळा झाल्यामुळे, शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळे दगावल्याची कारणे दिली आहेत. प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मृत पावलेल्या प्राण्यांमध्ये ठिपके असलेले हरीण, बार्किंग डिअर, इमूल, मकाऊ पोपट, कासव यांचा समावेश आहे.

आणखी वाचा- ‘महाराष्ट्र सरकारमध्ये लीडर नाही, तर डिलर बसले’, बिहारचे नेते तेजस्वी यादव यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याबाबत जिजामाता भोसले प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, प्राणी संग्रहालयातील हा मृत्यूदर अत्यंत सामान्य आहे. प्राणी संग्रहालयात चारशेहून अधिक प्राणी पक्षी आहेत. मृत पावलेल्या प्राणीपक्ष्यांमध्ये वृद्धत्व हेच मुख्य कारण आहे. तसेच मृत पावलेल्या प्राण्यांमध्ये दुर्मिळ प्राणी पक्षी नाहीत. हा मृत्यूदर जास्त असता किवा संशयास्पद कारण असते किंवा दुर्मिळ प्राणी पक्षांचे मृत्यू झाले असते तर सीझेडए नेच आम्हाला आधीच नोटीस पाठवली असती. त्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे डॉ. त्रिपाठी यांनी म्हटले आहे.