मुंबईः मोहरम निमित्त शहरात रविवारी विविध ठिकाणी मिरवणूकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दक्षिण मुंबईतील मिरवणुकांमध्ये ४० पेक्षा अधिक महागडे मोबाईल फोन चोरीला गेले आहेत. याबाबतची तक्रारी जे. जे. मार्ग, भायखळा आणि डोंगरी पोलिसांना प्राप्त झाल्या असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने काही संशयितांची ओळखही पटवण्यात आली आहे.

मोहरम निमित्त नागपाडा येथून सुरू झालेला मिरवणूक डोंगरीमार्गे भायखळा येथे पोहोचली होती. झरघड सय्यद (२८) हा तरूण सकाळी साडेचारच्या सुमारास बोहरी मोहल्ल्यातील झेनोबिया हॉल येथे मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी गेला असताना त्याच्या खिशातून आयफोन चोरीला गेला. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्याचा मोबाईल पळवला, असा संशय आहे. याप्रकरणी सीसीटीच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत. सय्यद जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याच्यासोबत अनेकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रार प्राप्त झाल्या आहेत. त्यात फराज सय्यद (सॅमसंग), वासी सय्यद (आयफोन १३), समर सय्यद (आयफोन १२), आणि गफ्फार दस्तानी (आयफोन १४) यांचा समावेश आहे. सर्वांनी झेनोबिया हॉल ते बोहरी मोहल्ला या मार्गावर मोबाईल चोरीला गेल्याचे सांगितले आहे. मोहरम निमित्त दक्षिण मुंबईत रविवारी मोठ्याप्रमाणात मिरवणूका निघाल्या होत्या. या सर्वांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) (चोरी) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याशिवाय दक्षिण मुंबईतील डोंगरीतील रहिवासी आणि विद्यार्थी मोहम्मद रकिब शेख (२०) याचा मोबाईल मोगल मस्जिद ते रामचंद्र भट मार्ग दरम्यान मिरवणुकीत असताना चोरीला गेला. या मिरवणूकीत सहभागी बहुतेक व्यक्ती पारंपरिक कुर्ता घालून आले होते, त्यामुळे काही प्रकरणात ब्लेडच्या साह्याने खिसे कापून मोबाईल चोरण्यात आले आहेत.