मुंबईकरांच्या सेवेसाठी चालक आणि वाहकासह भाडेतत्त्वावरील आणखी ४०० विनावातानुकूलित बसगाडय़ा बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीने मंगळवारी हिरवा कं दील दाखविला. कंत्राटदाराकडून चालकासह वाहकही उपलब्ध करण्यात येणार असल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला असून बेस्ट उपक्रमाची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याची टीका होऊ लागली आहे.

पुढील दोन-तीन वर्षांत ताफ्यातील बसगाडय़ांची संख्या सहा हजारांवर नेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात ३,६०० बसगाडय़ा असून भाडेतत्त्वावरील १,१०० बसगाडय़ांचा त्यात समावेश आहे. बेस्ट समितीने भाडेतत्त्वावरील विनावातानुकू लित आणखी ४०० बसगाडय़ा बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. एका कंपनीकडून प्रति किलोमीटर ८९ रुपये ९१ पैसे या दराने १० वर्षांकरिता भाडेतत्त्वावर या बसगाडय़ा घेण्यात येणार आहेत. बेस्ट उपक्र म दहा वर्षांसाठी तब्बल एक हजार ९४२ कोटी रुपये रक्कम मोजणार आहे. सध्या बेस्ट उपक्र म तोटय़ात आहे. टाळेबंदीत प्रवाशांची संख्या व उत्पन्नही कमी झाले. त्यातच एवढी मोठी रक्कम मोजून भाडेतत्त्वावर बसगाडय़ा घेण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या भाडेतत्त्वावरील बसगाडय़ांसाठी कंपनीकडूनच चालक आणि वाहकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

समितीसमोर आलेल्या या प्रस्तावाला भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी विरोध केला. यापूर्वी भाडेतत्त्वावर घेतलेल्या बसगाडय़ांवर कंत्राटदाराचाच चालक नेमण्यात आला होता. आता वाहकही त्यांचा असणार. हा बेस्टच्या खासगीकरणाचा डाव असून त्यामुळे उपक्रमातील कामगारांचे अस्तित्वच संपुष्टात येईल, अशी टीका त्यांनी केली. भाडेतत्त्वावरील बससाठी तब्बल १,९४२ कोटी रुपये मोजावे लागणार असून यासाठी निधी आणणार कु ठून, असा प्रश्न त्यांनी उपस्थित के ला. कलम ६३ नुसार बेस्ट व पालिके ने बसगाडय़ा खरेदी करून चालवणे बंधनकारक असतानाही त्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप गणाचार्य यांनी केला. या संदर्भात बेस्ट उपक्र माचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकु मार बागडे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

आजपर्यंत विविध महापालिकांनी भाडेतत्त्वावर बसगाडय़ा घेतल्या, पण त्यावर कंत्राटदाराच्या चालक-वाहकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. परंतु बेस्ट उपक्रमाने प्रथमच वाहकही कंत्राटदाराचा नेमण्याचा निर्णय घेत नवा पायंडा पाडला आहे, असा आरोप सदस्यांनी केला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

चालक-वाहकांसह बसगाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावाला भाजपने कडाडून विरोध के ला. यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही भाडेतत्त्वावरील बसगाडय़ांसाठी कंत्राटदाराचे वाहक नकोत अशी भूमिका घेतली होती. मात्र बैठकीत दोन्ही पक्षांनी घूमजाव करीत शिवसेनेला पाठिंबा देत प्रस्ताव मंजुरीस मदत के ली. प्रस्तावानुसार नव्याने येणाऱ्या ४०० बसवर चालकाबरोबरच वाहकही कंत्राटदाराचा असल्याने त्याला विरोधच आहे. परंतु मुंबईकरांना बसगाडय़ांची आवश्यकता असल्याने या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.