मुंबई : शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने श्वान निर्बिजीकरण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत गेल्या अडीच वर्षांत मुंबईत तब्बल ४२ हजार भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. चालू वर्षात (२०२५) जून महिन्यापर्यंत १० हजार ३७२ श्वानांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याचबरोबर पालिकेने रेबीज लसीकरणावरही भर दिला आहे.
भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी केवळ निर्बिजीकरण हाच कायदेशीर मार्ग आहे. अनेक वर्षांपूर्वी श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी विष टाकणे किंवा अन्य अमानवी पद्धती वापरल्या जात होत्या. त्यांनतर प्राण्यांप्रती संवेदनशीलता वाढल्यामुळे, तसेच प्राणीप्रेमी संस्थांच्या पुढाकाराने देशभरात निर्बीजीकरण उपक्रम सुरू झाले. मुंबई महानगरपालिका १९९४ पासून श्वान निर्बीजीकरण व रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम नियमीतपणे राबवत आहे. अलीकडच्या काळात श्वानांना खाद्य देण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी, श्वानांच्या संख्येत वाढ झाल्याचे उघडकीस आले आहे. महापालिका उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी भटक्या प्राण्यांचे लसीकरण, निर्बीजीकरण केले जात आहे. त्यात ‘ऑल अबाऊट देम’, ‘मिशन कम्पॅशन’, ‘द फेलिन फाऊंडेशन’, ‘यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स फाऊंडेशन’ (योडा), ‘इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स’, ‘उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन’, ‘वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज’ आदी संस्थांचा सहभाग आहे.
मुंबईत भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांमार्फत १९९४ पासून जून २०२५ पर्यंत एकूण ४ लाख ३० हजार ५९५ भटक्या श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने २०२३ ते २०२५ (जून) या कालावधीत मुंबईतील एकूण ४२ हजार १७५ श्वानांचे निर्बीजीकरण केले आहे. २०२३ मध्ये १४ हजार ९५४ श्वानांचे, २०२४ मध्ये १६ हजार ८४९ श्वानांचे, तर जून २०२५ पर्यंत १०३७२ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान, महापालिकेने १९९४ पासून डिसेंबर २०२३ पर्यंत ४ लाख ३ हजार ३७४ श्वानांचे निर्बिजीकरण केल्याचे पालिकेने प्रकाशित केलेल्या भटक्या श्वानांच्या सर्वेक्षण अहवालातून समोर आले होते. महापालिकेने २०१४ ते २०२३ या कालावधीत विविध स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने १ लाख ४८ हजार ८४ श्वानांचे निर्बिजीकरण केले. २०१७ मध्ये सर्वाधिक म्हणजेच २४ हजार २९०, तर २०१५ मध्ये सर्वात कमी म्हणजेच ६ हजार ४१४ श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले होते.
श्वानांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यास परिसंस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे श्वान – मानव संघर्ष होण्याचाही धोका असतो. मात्र, महापालिकेच्या निर्बीजीकरण व लसीकरण उपक्रमांमुळे मुंबईत परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच, मुंबईकरांकडूनही या उपक्रमांना प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती महापालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली.