मुंबई : राज्यातील चार कृषी विद्यापीठाअंतर्गत शिकविण्यात येणाऱ्या कृषी अभ्यासक्रमांच्या नऊ शाखांच्या पहिल्या प्रवेश फेरीत १० हजार ९३० विद्यार्थ्यांपैकी अवघ्या ५ हजार ३१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. पहिल्या फेरीमध्ये कृषी अभ्यासक्रमासाठी ४८ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या बी.एस्सी कृषी, बी.एस्सी उद्यानविद्या, बी.एस्सी वनविद्या, बी.एफएस्सी मत्स्यशास्त्र, बी.टेक अन्न तंत्रज्ञान, बी.टेक जैवतंत्रज्ञान, बी.टेक कृषी अभियांत्रिकी, बी.एस्सी सामुदायिक विज्ञान, बीएस्सी कृषी व्यवसाय व्यवस्थापन या नऊ शाखांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. कृषी अभ्यासक्रमासाठी २२ हजार ६८५ विद्यार्थांनी अर्ज नोंदणी केली होती. त्यातील १८ हजार ९०२ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरला होता. पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांमधून पहिल्या फेरीसाठीची निवड यादी ९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये १० हजार ९३० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. यापैकी ५ हजार ३१६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला. पहिल्या फेरीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ४८ टक्के इतके असल्याची माहिती सीईटी कक्षातील कृषी विभागाचे समन्वयक डॉ. मंगेश निकम यांनी दिली.

दुसऱ्या फेरीची निवड यादी १६ ऑगस्ट रोजी

पहिल्या फेरीमध्ये ४८ टक्के प्रवेश झाले असून आता दुसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार १४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची मुभा देण्यात आली होती. या फेरीसाठी पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी १६ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार असून, या विद्यार्थ्यांना १७ ते १९ ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.

कृषी अभ्यासक्रमासाठी ७ हजार ७९६ जागा

राज्यातील चार विद्यापीठांतर्गत असलेल्या १९८ महाविद्यालयांमध्ये १७ हजार ७९६ जागा आहेत. यापैकी ४७ शासकीय महाविद्यालयांमध्ये ३ हजार ६२६ जागा, तर १५१ खासगी महाविद्यालयांमध्ये १४ हजार १७० इतक्या जागा आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा या बीएस्सी कृषी अभ्यासक्रमासाठी १२ हजार २३८ इतक्या आहेत. त्याखालोखाल अन्न तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी १ हजार ४४०, उद्यानविद्यासाठी १ हजार १३२, जैव तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी १ हजार ४०, कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी ९००, कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी ८६४, वनशास्त्रासाठी ८२, सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमासाठी ६० आणि मत्स्यशास्त्रासाठी ४० जागा आहेत.