‘कार्ड क्लोनिंग’च्या आधारे फसवणूक करणारी टोळी गजाआड; पर्यटन स्थळांवरील दुकानदारांच्या संगनमताने ४० कोटींची लूट

मुंबई : अन्य देशांतील नागरिकांच्या डेबिट तसेच क्रेडिट कार्डाचा तपशील मिळवून बनावट कार्डे तयार करून त्याआधारे लाखो रुपये परस्पर बळकावणाऱ्या एका टोळीला मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अटक केली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील पर्यटनस्थळांवरील दुकानदारांना पैशांची लालूच दाखवून त्यांच्याकडील ‘स्वाइप’ यंत्राच्या मदतीने ही टोळी परदेशी नागरिकांच्या बँकखात्यातून पैसे लांबवत होती.

गुन्हे शाखेचे उपायुक्त दिलीप सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१३ पासून सक्रिय असलेल्या या टोळीने आतापर्यंत ४० कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. याबाबत एकाही परदेशी नागरिकाकडून तक्रार न आल्याने ही टोळी निर्धास्त होती. मात्र, खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे प्रभारी निरीक्षक रहिमतुल्ला सय्यद, संतोष गायकर, धीरज कोळी आदींच्या पथकाने या टोळीच्या मुसक्या आवळल्या. मुख्य सृत्रधारासह पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून विविध राज्यांमधील दुकानदारांच्या नावे असलेल्या ५१ स्वाईप मशिन, ६५ बनावट कार्ड आणि असंख्य बॅंकांचे दस्तऐवज हस्तगत करण्यात आले. झुबेर सय्यद, हसन शेख, फहीम कुरेशी, अबूबकर आणि महोम्मद हुसेन पाल अशी अटक आरोपींची नावे आहेत. या टोळीला डेबिट/क्रेडिट कार्डाचा तपशील पुरवणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

फसवणुकीची कार्यपद्धत

ही टोळी दोन भारतीय तरुणांकडून परदेशी नागरिकांच्या कार्डाचे तपशील मिळवत होती. या तपशीलाच्या आधारे बनावट कार्डे तयार केली जात. या कार्डाद्वारे एटीएममधून पैसे काढण्याऐवजी देशभरातील पर्यटनस्थळांवरील निवडक दुकानदारांशी त्यांनी संधान बांधले होते. या दुकानदारांना आर्थिक लालूच दाखवून त्यांची स्वाइप यंत्रे मिळवायची आणि त्या यंत्रांमधून मोठमोठय़ा रकमेचे आर्थिक व्यवहार करायचे, अशी या टोळीची कार्यपद्धत होती.

परदेशी बँकांतील अधिकाऱ्यांशी लागेबांधे?

या टोळीने अमेरिका, चीन आणि मध्यपुर्वेतील नागरिकांनाच सर्वाधिक लक्ष्य केले. परदेशी नागरिकांच्या डेबीट-क्रेडीट कार्डावरील तपशीलांसह त्यांचा पीन क्रमांकही टोळीच्या हाती लागल्याने गुन्हे शाखेकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. बनावट कार्डाद्वारे व्यवहार करत असताना माहिती पुरवणारे दोन आरोपी तेथे प्रत्यक्ष हजर असत. त्यांना संबंधीत नागरिकाच्या खात्यात किती पैसे असावेत, याचाही अंदाज होता. त्यामुळे माहिती पुरवणाऱ्या आरोपींचे लागेबांधे परदेशी बॅंकांमधील अधिकाऱ्यांशी असावेत, असा अंदाजही व्यक्त होत आहे.

दुकानदारांना ‘कमिशन’

गुन्ह्यासाठी दुकानातील स्वाईप यंत्राचा वापर करून देण्याच्या बदल्यात टोळी दुकानदारांना कमिशन देत होती. हे कमिशनपोटी दुकानदारांना टोळीकडून मिळणारी रक्कम व्यवहाराच्या २० टक्क्यांपासून ६० टक्क्यांपर्यंत असे. या व्यवहारांमधून दुकानदारांच्या खात्यांमध्ये आलेले पैसे टोळी काढून घेत असे. पोलीस दारावर आलेच तर दुकानात आलेल्या ग्राहकाने कार्डाद्वारे पैसे अदा केले. ते कार्ड खरे की खोटे, त्याचे की परदेशी नागरिकाचे याच्याशी आमचा काय संबंध, हे उत्तर दुकानदारांनी तयार ठेवले होते.