मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दिवसेंदिवस पाणीसाठा कमी होत असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५.६४ पाणीसाठा कमी आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मुंबईत येत्या ३० मेपासून ५ टक्के, तर ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना पाणीपुरवठा केला जातो, त्यातही ५ टक्के आणि १० टक्के कपात लागू होणार आहे.

मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ इतकी आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही मुंबईकरांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. सध्याचा उपलब्ध पाणीसाठाही पुरेसा नसल्याने पालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. २०२१ आणि २०२२ या दोन वर्षात १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून सक्रिय होता. मात्र २०२३ या वर्षात ऑक्टोबर महिन्यात तुलनेने पाऊस झाला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणसाठ्यामध्ये सुमारे ५.६४ टक्के पाणीसाठा कमी आहे. शनिवारी म्हणजेच आज मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये एकूण १ लाख ४० हजार २०२ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटरच्या तुलनेत आता केवळ ९.६९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासनाचे अत्यंत बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे.

हेही वाचा – पदवीधर, शिक्षक मतदारसंघांतील निवडणूक २६ जूनला

हेही वाचा – मुंबई पदवीधरवरून भाजप, शिंदे गटात चढाओढ; ठाकरे गटाकडून अनिल परब उमेदवार

भातसा धरणातून १,३७,००० दशलक्ष लिटर तर अप्पर वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. दरम्यान, यंदा पावसाचे वेळेवर आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अलीकडे वाढलेले तापमान, पर्यायाने वाढणारे बाष्पीभवन आणि पाणीसाठा १० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यानंतर पाणीपुरवठा नियोजनपूर्वक करता यावा, या सर्व खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेकरून पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे