मुंबई : बेस्ट बसच्या पुढे चुकीच्या पध्दतीने जाण्याचा (ओव्हरटेक) प्रयत्न केल्याने एका दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या ५३ वर्षीय जुनिअर आर्टीस्ट महिलेचा मृत्यू झाला. गोरेगाव चेक नाका येथे हा अपघात झाला. आरे सब पोलिसांनी दुचाकी चालविणाऱ्या २९ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अंबुबाई सोनावणे (५३) या चित्रपटात जुनिअर आर्टीस्ट म्हणून काम करतात. त्या गोरेगावच्या शांती निकेतन परिसरात मुलगा, सून आणि मुलीसह राहतात. त्या ५ ऑगस्ट रोजी चित्रिकरणासाठी गोरेगावच्या चित्रनगरीत गेल्या होत्या. त्या सकाळी ८.३० च्या सुमारास घरी परतत असताना त्यांना शुभम घाटवळ (२९) भेटला. त्याने त्यांना त्याच्या दुचाकीवरून घरी सोडत असल्याचे सांगितले. त्यामुळे सोनावणे त्याच्या दुचाकीवर बसल्या.
बसच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात अपघात
शुभम गोरेगवाच्या पिकनिक पॉईंट येथून सोनावणे यांना घेऊन निघाला होता. गोरेगाव चेक नाक्याच्या दिशेने ते जात होते. पुढे बेस्टची बस जात होती. शुभमने चुकीच्या पध्दतीने बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात शुभमच्या दुचाकीने समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत सोनावणे खाली पडल्या आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. शुभमने त्यांना रिक्षात बसवून सेव्हन हिल्स रुग्णालयात नेले. तेथे प्रथोमपचार करून त्यांना घरी आणण्यात आले. सोनावणे यांचा मुलगा शिवराज त्यांना जोगेश्वरी पूर्वेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात घेऊन गेला. तेथे रात्री उपचारादरम्यान सोनावणे यांचा मृत्यू झाला.
दुचाकीचालकाविरोधात गुन्हा
शुभम भरधाव वेगाने दुचाकी चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरे सब पोलिसांनी मोटार वाहन अधिनियमाच्या कमल १८४, तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१) आणि २८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.