मुंबईतील करोनामुक्त रुग्णांचा दर ९२ टक्के झाला आहे. सोमवारी ५४४ नवीन रुग्ण आढळले तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील एकूण रुग्णांपैकी ९२ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर करोनावाढीचा दरही चांगलाच खाली आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील रुग्णवाढीचा दर आणखी घसरून ०.२५ टक्के झाला आहे. दिवाळीनंतर काही दिवस हा दर ०.३७ टक्क्यांपर्यंत वाढला होता. मात्र आता रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागली असून दर दिवशी आठशेच्या आत रुग्ण आढळत आहेत. सोमवारी तर ही संख्या आणखी घटली. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून २८० दिवस झाला आहे. नवीन ५४४ रुग्ण आढळल्यामुळे एकूण बाधितांची संख्या २ लाख ८६ हजारांच्या पुढे गेली आहे. तर एका दिवसात तिपटीपेक्षा जास्त म्हणजेच १,५९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत २ लाख  ६२ हजारांहून अधिक म्हणजेच ९२ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. गेल्या आठवडय़ाभरापासून दर दिवशी सलग १६ हजारांहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. मात्र त्यापैकी केवळ ५ टक्के अहवाल बाधित येत आहेत. मात्र सोमवारी केवळ दहा हजार चाचण्या करण्यात आल्या होत्या. दिवसभरातील रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही दिवसेंदिवस घट होत असून सोमवारी ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात आठ पुरुष आणि तीन महिला होत्या. मृतांचा एकूण आकडा १०,९१३ झाला आहे. सध्या मुंबईत १२,०६५ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी केवळ अंदाजे २५०० रुग्णांना लक्षणे आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ४०२ नवे रुग्ण 

ठाणे : जिल्ह्य़ात सोमवारी ४०२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ३३ हजार ३२४ इतकी झाली आहे. तर, भिवंडी शहरात सोमवारी एकही नवा करोना रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्य़ात दिवसभरात ७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५ हजार ७५१ इतकी झाली आहे.  नव्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील १०५, कल्याण-डोंबिवली शहरातील १०३, नवी मुंबईतील ८०, बदलापूरमधील ३४ जणांचा समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 544 newly affected in mumbai abn
First published on: 08-12-2020 at 00:28 IST