लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः धारावी येथे ५९ वर्षीय व्यक्तीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. मृत व्यक्तीचा मोबाईल, घड्याळ व अंगठी गायब असून याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी जबरी चोरी व हत्येचे गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी २६ वर्षीय तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे.
मृत यशवंत सोनावणे धारावीतील पिठाच्या गिरणी मागे आदर्श नगर येथील खोली क्रमांक २३ मध्ये राहत होते. सोनावणे रविवारी पहाटे घरी असताना त्यांच्या राहत्या घरी गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यांच्या गुप्तांगावर मारहाण झाल्याचे पंचनाम्यात निष्पन्न झाले आहे. घटनेनंतर त्यांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आणखी वाचा-मुंबई: पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड
याप्रकरणी सोनावणे यांचा भाऊ सूर्यकांत सोनावणे यांच्या तक्रारीवरून शाहू नगर पोलिसांनी जबरी चोरी, हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मृत व्यक्तीचा मोबाईल, घड्याळ व अंगठी गायब असल्याचे सूर्यकांत सोनावणे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाख केल्यानंतर परिसरात राहणारा जेम्ब पॉल करारन(२६) याला शाहू नगर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.