मुंबई : मालाड येथील मढ परिसरात घरे देण्याचे आमिष दाखवून महिला मंडळातील सुमारे ६० महिलांकडून प्रत्येकी चार लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी दोन भावांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एकूण दोन कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारी करण्यात आला असून याप्रकरणी मालवणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा >>> सहा हजारांहून अधिक कामगारांनी गिरवले सुरक्षेचे धडे, बुलेट ट्रेन प्रकल्पाचा उपक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मढ येथील शिवाजी नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या साधना शिवाजी भंडारे (४०) यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. तक्रारीनुसार मढ येथील शिवाजी नगरमधील सीटीएस क्रमांक ६७७ येथे ६० खोल्या देण्याचे आश्वासन आरोपींनी भंडारे व इतर ५९ महिलांना दिले होते. यासंदर्भात आरोपींनी महिला मंडळातील ६० महिलांसोबत कागदोपत्री करार करून प्रत्येकी चार लाख रुपये घेतले, असे तक्रारीत म्हटले आहे. २० ऑगस्ट २०१६ ते २१ जून २०२४ या कालाधीत हा गुन्हा घडला. सामंजस्य करारानुसार या सर्व महिलांनी प्रत्येकी ४ लाख रुपये असे एकूण दोन कोटी ४० लाख रुपये आरोपींना दिले. पण त्या ठिकाणी अद्याप कोणत्याही प्रकारच्या खोल्या बांधून तक्रारदार महिलांना देण्यात आलेल्या नाहीत. तसेच त्यांना त्यांचे पैसेही परत मिळालेले नाहीत, असे भंडारे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे मालवणी पोलिसांनी याप्रकरणी अविनाश भानजी व प्रमोद भानजी या दोन भावांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मालवणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. सर्व तक्रारदार महिला गरीब असून छोटी-मोठी कामे करून आपला उदरनिर्वाह चालवतात. आरोपींनी त्यांच्याकडून चार – पाच हजार असे करून पैसे घेतले होते. तक्रारदार महिलांनी २०१६ पासून रक्कम जमा केली होती. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी पाच – सहा महिलांना घरे देण्यात आली होती. पण या महिलांकडून रक्कम घेऊन अद्याप त्यांना घर देण्यात आलेले नाही. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे मान्य केले.