लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम परिसरातील ‘हायमास्ट’ची (उंचावरील प्रखर दिवे) दुरुस्ती आणि संरचनात्मक बांधणी करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. गेल्या आठ – दहा वर्षांमध्ये उभारण्यात आलेल्या या दिव्यांच्या दुरुस्तीसाठी महानगरपालिकेला ६९ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.

अंधेरी, जोगेश्वरी परिसरात २०१३ ते २०१७ या काळात तब्बल ११४ ‘हायमास्ट’ बसविण्यात आले होते. रात्री अंधूक प्रकाश असलेल्या चौकांत किंवा एखाद्या परिसरात उंचावर हे प्रखर दिवे बसविण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली होती. असे अनेक दिवे या परिसरात बसविण्यात आले आहेत. यापैकी बहुतांश दिवे आता वारंवार बंद पडू लागले आहेत.

हेही वाचा… मुंबईः अनैतिक संबंधांच्या संशयावरून हत्या; आरोपी अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर दिव्यांचे खांब उभारण्यासाठी तयार केलेली संरचनात्मक व्यवस्था (पाया) कमकुवत झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे के पश्चिम विभाग कार्यालयाने या ११४ ‘हायमास्ट’ची पाहणी केली होती. त्यावेळी ५४ हायमास्ट सुस्थितीत असल्याचे आढळून आले, तर ६० हायमास्टची दुरुस्ती आणि पाया मजबूत करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे महानगरपालिकेने या कामासाठी अंदाजपत्रक तयार करून निविदा मागवल्या होत्या. या कामासाठी ६९ लाख १५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.