मुंबई : मुंबईतील एकूण सोसायट्यांपैकी सुमारे ९० टक्के सोसायट्यांमधील झाडांच्या फांद्यांची छाटणी पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे. सुमारे नऊ हजार सोसायट्यांपैकी ८,३००  सोसायट्यांमधील वृक्ष छाटणीचे काम पूर्ण झाले आहे. तर अद्याप ७०० सोसायट्यांमधील वृक्षछाटणी झालेली नाही. भविष्यात वृक्ष छाटणीसाठी यांत्रिक शिडीचा वापर करण्यात येणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत अतिवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडतात, तसेच वृक्षाच्या फांद्या तुटून अपघात होतात. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतर्फे रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येते. तसेच खासगी भूखंडावरील सोसायट्यांमधील झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यासाठी संबंधित पदाधिकाऱ्यांनी अर्ज केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेतर्फे फांद्याची छाटणी केली जाते.  मुंबईत सुमारे २९ लाख झाडे असून त्यापैकी सुमारे १५ लाख झाडे खासगी भूखंडावर आहेत. दरवर्षी पावसाळ्यात झाडे उन्मळून किंवा झाडांच्या फांद्या तुटून पडल्यामुळे अपघात होतात. त्यात अनेकदा जीवित हानी होते. त्यामुळे उद्यान विभागातर्फे दरवर्षी कंत्राटदारामार्फत रस्त्यावरील झाडांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्याची छाटणी करण्यात येते. यासाठी दरवर्षी सुमारे ५० कोटी रुपये खर्च करण्यात येतात. तर खासगी आवारातील झाडांची छाटणी नागरिकांना करवून घ्यावी लागते.

उद्यान विभागाने मुंबईतील सुमारे नऊ हजार गृहनिर्माण संस्था, तसेच अन्य खाजगी जागेतील वृक्षांची पहाणी करून झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यासाठी संबंधितांवर नोटीस बजावली होती. त्यापैकी ८३०० ठिकाणी वृक्ष छाटणीचे काम पूर्ण झाले आहे व इतर ठिकाणी कामे प्रगतीपथावर आहेत. या झाडांच्या छाटणीसाठी यंदा मुंबई महानगरपालिकेने यांत्रिक शिडीचा वापर केला. नारळ, ताडगोळे व बॉटल पाम यासारख्या चढण्यास अवघड वृक्षांच्या झावळ्या व फळे काढण्यासाठी यांत्रिक शिडीचा वापर करण्यात येतो. यांत्रिक शिडीचा वापर करून महानगरपालिकेच्या एम पूर्व विभाग कार्यालयाच्या आवारातील बॉटल पाम, तसेच देवनार, महानगरपालिका वसाहतीमधील उंच नारळाच्या झाडाच्या झावळ्या काढण्यात आल्या. तसेच इंडियन ऑइल नगर गोवंडी येथील पूर्व मुक्त मार्गाच्या बाजूस झुकलेल्या वृक्षांच्या धोकादायक फांद्यांच्या छाटणीसाठी यांत्रिक शिडीचा वापर करण्यात आला. खासगी सोसायट्यांमधील वृक्ष, फांद्याची छाटणी अद्याप बाकी असल्यास गृहनिर्माण संस्था व इतर आस्थापनांनी मुंबई महानगरपालिकेच्या जवळच्या विभाग कार्यालयातील उद्यान खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उद्यान अधिक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.