गेले दोन-तीन दिवस सतत मुंबईतील करोनाबाधितांची संख्या एक हजाराच्या वर गेल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत होती. मात्र सोमवारी पुन्हा एकदा रुग्णसंख्या एक हजाराच्या खाली घसरली आहे.  सोमवारी ८०० जणांना करोनाची बाधा झाली, तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईमध्ये करोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे पालिका यंत्रणा सतर्क झाली असून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गेल्या आठवडय़ात पुन्हा करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने पालिका अधिकारी चिंतित झाले होते. मात्र सोमवारी पुन्हा एकदा रुग्णसंख्या एक हजाराच्या खाली घसरली. नव्या ८०० रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या दोन लाख ७६ हजार ५०७ वर पोहोचली आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले नऊ पुरुष आणि पाच महिलांचा करोनामुळे मृत्यू झाला असून मुंबईत करोनामुळे आतापर्यंत १० हजार ६८७ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

विविध रुग्णालयांत उपचार घेणारे ३७२ रुग्ण सोमवारी करोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले. आजघडीला एकूण १० हजार १४१ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

मुंबईमधील करोनावाढीच्या दरात अल्पशी वाढ होऊन तो ०.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांवर स्थिरावले आहे, तर मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी सरासरी २३३ दिवसांवर गडगडला आहे. १८ नोव्हेंबर रोजी रुग्णदुपटीचा कालावधी सरासरी ३२० दिवसांवर पोहोचला होता.

करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. फेरीवाले, हॉटेलमधील आचारी, वाढप्यांची चाचणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. आतापर्यंत तब्बल १७ लाख ८५ हजार ३०८ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

राज्यात ४,१५३ नवे रुग्ण

* राज्यात गेल्या २४ तासांत ४,१५३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, ३० जणांचा मृत्य.

* दिवसभरात नाशिक शहर २४२, पुणे शहर २१४, पिंपरी-चिंचवड १५०, उर्वरित पुणे जिल्हा १६४, नागपूर शहर २५६ नवे रुग्ण.

* राज्यात आतापर्यंत १७ लाख ८४ हजार करोनाबाधित झाले असून ४६६५३ जणांचा मृत्यू.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 800 infected in mumbai 14 patients died abn
First published on: 24-11-2020 at 00:18 IST