मुंबईनजीक २५० कार्यकर्त्यांकडून सफाई; ८०० किलो कचऱ्यात ९० टक्के मद्याच्या बाटल्या

पावसाने काढता पाय घेतल्यानंतर धबधब्यांवरील पर्यटकांची गर्दीही ओसरू लागली आहे. मात्र, या धबधब्यांच्या ठिकाणी गेल्या दोन-तीन महिन्यात भीषण कचरा साचला असून यात बहुतांश कचरा ‘तळीराम’ पर्यटकांनी टाकलेल्या मद्याच्या बाटल्यांचा आहे. एका पर्यावरणवादी संस्थेने या ठिकाणांहून जमा केलेल्या जवळपास ८०० किलो कचऱ्यात ९० टक्के या मद्याच्याच बाटल्या आहेत.

पावसाळी पर्यटनासाठी मुंबई शहरापासून दोन-अडीच तासाच्या अंतरावर ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पहिल्या पावसानंतर येथे सुरू होणारे धबधबे हे पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचा विषय बनतात. सह्य़ाद्रीच्या खडकाळ कडय़ांवरून खोल कोसळणाऱ्या या जलौघांना याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो पर्यटक गर्दी करतात. मात्र, यातील अनेक पर्यटक पर्यटनस्थळी ‘कचरा’ करण्यासाठीच येत असल्याचा अनुभव येत आहे. येणाऱ्या पर्यटकांमध्ये तळीरामांची संख्या जास्त असल्याने ते आपल्यासोबत आणलेल्या मद्याच्या बाटल्या तेथेच टाकून जातात. यात तरुणांचा सहभाग जास्त असून ते उन्मादात बाटल्या खडकावर फोडण्याचा विकृत आनंद घेताना दिसतात. या बाटल्यांच्या कचऱ्याच्या बरोबरीनेच सोबत आणलेल्या खाद्यपदार्थाच्या प्लास्टिकच्या पिशव्या, वेफर्सची पाकिटे, कागद तेथेच सोडून दिल्याने या निसर्गरम्य स्थळांचे विद्रूपीकरण होत आहे.

मुंबईतील ‘एन्व्हायर्न्मेंट लाइफ’ या पर्यावरणवादी संस्थेने नुकतीच मुंबई शहरानजीकच्या खारघरचा पांडवकडा, वसईतील चिंचोटी, खोपोलीमधील झेनिथ आणि नेरळमधील आनंदवाडी, जुम्मापट्टी, टपलावाडी या सहा अत्यंत गर्दी होणाऱ्या धबधब्यांच्या ठिकाणी सफाई मोहीम राबवली. ‘एनएसएस’ आणि ‘एनसीसी’ व संस्थेचे मिळून २५० कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

अन्य संस्थांचाही सहभाग

आमच्या संस्थेच्या बरोबरीनेच वसईतील पवन देशमुख यांच्या ‘साह्य़मित्र’ या गिर्यारोहण संस्थेने सफाई मोहीमेत सहभाग घेतला होता. यासाठी आम्ही महाराष्ट्र शासन स्वच्छता अभियान विभाग, महाराष्ट्र पर्यटन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आदींना सहभागी होण्याची विनंती केली होती. मात्र, या सरकारी संस्थांनी या सफाई मोहिमेला येतो सांगून गैरहजर राहत दूर राहणेच पसंत केले.

संस्थेच्या कार्यकर्त्यांनी २० किलो वजनाच्या ४१ प्लास्टिक पिशव्या भरून जवळपास ८०० किलोच्या आसपास कचरा गोळा केला आहे. यात खारघर येथे ८० किलो, नेरळ-माथेरान येथील धबधब्यांवर ३६० किलो, चिंचोटी, वसई येथे २६० किलो आणि खोपोली येथे १२० किलो कचरा उचलण्यात आला. या कचऱ्यात निव्वळ मद्याच्या बाटल्यांचा खच होता.  धर्मेश बराई, प्रमुख, ‘एन्व्हायर्मेट लाईफसंस्था.