मुंबईतील करोना चाचण्यांच्या संख्येने सहा लाखाचा टप्पा पार केला आहे. सोमवारी ९२५ नवीन रुग्ण आढळले असून ४६ जणांचा मृत्यू झाला. बाधितांचा आकडा एक लाख २४ हजारावर गेला असून ७८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील करोना रुग्णवाढीचे प्रमाण आटोक्यात आले असून ते सध्या सरासरी  ०.८७ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ८७ दिवसांवर म्हणजेच तीन महिन्यांपर्यंत गेला आहे.

मुंबईतील एकूण बाधितांचा आकडा १,२४,३२२ वर गेला आहे. त्यापैकी ९७,९९३ म्हणजेच ७८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर १९,१९० रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण बाधितांपैकी केवळ ५ टक्के म्हणजेच ५६०० रुग्णांना लक्षणे असून १३ हजार रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर १०८२ म्हणजेच १ टक्के रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

सोमवारी ४६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा ६,८४२ वर गेला आहे. मृत्यदर ५.५ टक्के आहे. ४६ मृतांपैकी ३९ जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांपैकी २६ पुरुष आणि २० महिला होत्या.

राज्यात ९,१८१ बाधित

दोन दिवसांच्या तुलनेत राज्यात करोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण घटले. गेल्या २४ तासात ९१८१ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, २९३ जणांचा मृत्यू झाला.  राज्यात आतापर्यंत १८ हजार रुग्ण दगावले आहेत.  राज्यात सध्या १ लाख ४७ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात सोमवारी ९९१ नवे करोना रुग्ण

ठाणे : जिल्ह्यत सोमवारी  ९९१ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ९९ हजार १५८  झाली आहे. जिल्ह्य़ात दिवसभरात ३० जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या २, ७७७  झाली आहे. ठाणे जिल्ह्य़ात दीड महिन्यापासून दररोज एक हजाराहून अधिक रुग्ण आढळत होते.  सोमवारी रुग्णांची संख्या घटली. नव्या ९९१  बाधितांमध्ये नवी मुंबईतील २७४, कल्याण-डोंबिवली शहरातील २०१, ठाणे शहरातील १५४, मीरा-भाईंदरमधील १३१, ठाणे ग्रामीणमधील ९४, बदलापूरमधील ६१, अंबरनाथमधील ३७, उल्हासनगरमधील २९ आणि भिवंडीतील १० रुग्णांचा समावेश आहे. तर, सोमवारी जिल्ह्य़ात ३० करोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीमधील ८ ठाणे ग्रामीणमधील ७, ठाण्यातील ५, मीरा-भाईंदरमधील ५, नवी मुंबईतील २, उल्हासनगरमधील २ आणि मीरा-भाईंदरमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 925 new patients 46 deaths in mumbai abn
First published on: 11-08-2020 at 00:39 IST