संदीप आचार्य
करोनाग्रस्तांची दिवसागणिक वाढणारी संख्या आणि भयात भर घालणारे मृत्यूचे आकडे यांमुळे सर्वत्र नैराश्याचे ढग दाटले असतानाच, दिलासा देणारी एक रुपेरी किनार भविष्याच्या आशेत भर घालणारी ठरत आहे. करोनाच्या विळख्यात सापडला की मृत्यू अटळच या भीतीला पळवून लावून जगण्याची उमेद वाढविणाऱ्या या बातमीचे नायक आहेत नव्वदी पार केलेले ९४ करोना रुग्ण! खऱ्या अर्थाने करोनायोद्धे ठरलेल्या या वृद्ध योद्ध्यांनी महाराष्ट्राच्या करोनाविरोधी लढाईला बळ दिले आहे. नव्वदी पार केलेल्या या ९४ वृद्धांनी करोनाशी यशस्वी झुंज देऊन त्यास परतवून लावल्याने, महाराष्ट्राच्या करोनाविरोधी लढाईसही बळ मिळाले आहे.

महाराष्ट्रातील व विशेषतः महामुंबई परिसरातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. करोनाची लागण होणाऱ्या रुग्णांचा आणि मृतांचाही आकडा वाढत असताना, गेल्या काही महिन्यांपासून लपविलेली मृत्युसंख्याही टप्प्याटप्प्याने उघडकीस येऊ लागल्याने भीतीत भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर, करोनाशी दोन हात करून बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याने, करोना निर्मूलन यंत्रणेनेही काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे. वयाची साठी ओलांडलेल्या किंवा आणि काही व्याधींचा पूर्वेतिहास असलेल्यांना या आजारापासून गंभीर धोका संभवतो असे मानले जात असताना, तब्बल ९४ रुग्णांनी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर वयाच्या नव्वदीनंतरही करोनाशी सामना केल्याने या यंत्रणेचे मनोधैर्य बळावले आहे. या वयोवृद्धांनी जेव्हा घरी परतण्यासाठी रुग्णालयाबाहेर पहिले पाऊल टाकले, तेव्हा तेथील आरोग्य यंत्रणांच्या टाळ्या आणि नमस्कारांच्या कृतीतून लढाईच्या विजयाचा आनंद ओसंडून वाहात होता.

राज्यातील रुग्णसंख्येने आज दीड लाखांचा टप्पा गाठला आहे, आणि मृत्युसंख्या सात हजारांच्या घरात पोहोचली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, एकट्या मुंबईतच ७० हजार ७७८ रुग्णअसून ४०६२ हून अधिक रुग्णांना करोनाने गिळले आहे. तरीही, बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आजपर्यंत ७७ हजार ४५३ रुग्णांनी करोनाशी यशस्वी मुकाबला केला आहे. गुरुवारी एका दिवसांत बरे झालेल्या ३६६१ रुग्णांना घरी पाठविण्यात आले. त्यामध्ये विविध वयोगटांतील रुग्णांचा समावेश असला, तरी नव्वदी पार केलेल्या रुग्णांनाही करोनाच्या विळख्यातून वाचविण्यात आरोग्य यंत्रणांना आलेले यश अधिक उठावदार ठरले आहे. या ९४ जणांमध्ये मुंबईतील मुंबईतील ४१, ठाण्यातील १५, पुण्यातील १३ रुग्णांचा समावेश आहे. करोनाचा उद्रेक असलेल्या क्षेत्रांतील ही दिलासादायक बातमी ठरली आहे.

पुण्याचे ९२ वर्षांचे खरे आजोबा आज ठणठणीत आहेत. करोना झाला तेव्हा खरंतर घरच्यांनी आशा सोडली होती. डॉक्टर उपचार करत होते. काय होईल याचा अंदाज त्यांनाही नव्हता. करोना झालेल्या तरुण रुग्णांचा बघता बघता काळाने त्यांच्यासमोरच घास घेतला होता. अशावेळी ९२ वर्षांचे खरे आजोबा करोनाचा सामना करतील अशी वेडी आशा बाळगायला रुग्णालयातील कोणीच तयार नव्हते. पण डॉक्टर मंडळी आपले उपचार प्रामाणिकपणे करत होते. बघता बघता त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले आणि सार्वांच्याच आनंदाला पारावार राहिला नाही. एक मोठे युद्ध जिंकल्याचे समाधान सर्वांच्याच चेहेऱ्यांवर दिसत होते. खरे आजोबांना घरी सोडताना टाळ्यांचा एकच गजर डॉक्टरांसह रुग्णालयातील सर्वांनी केला.

मुंबईतील ९१ वर्षांचे गजाभाऊ असो की सोलापूरचे ९४ वर्षांचे हमीदभाई असो सर्वांचीच कथा थोड्याफार फरकाने अशीच आहे.
“करोनाच्या छाताडावर पाय देऊन त्यास परतवून लावणाऱ्या या ९४ वृद्ध योद्ध्यांमुळे या आजाराचे भय कमी होण्यास मदत झाली आहे”, असा विश्वास राज्याचे प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनी व्यक्त केला. “आजपर्यंत ७७ हजाराहून अधिक करोना रुग्ण आजपर्यंत बरे झाले आहेत. आमचे डॉक्टर व परिचारिका जीवाची बाजी लावून रुग्णसेवा करत आहेत. यातूनच हजारोंच्या संख्येने रुग्ण बरे होत आहेत. ९० वर्षांवरील ९४ रुग्ण बरे होणे हा चमत्कार नाही तर या वृद्धांची इच्छाशक्ती आणि आमच्या डॉक्टरांनी केलेले परिश्रम याचे हे फलित आहे ” असंही डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.