मुंबईतील रस्त्यांची किती दुरवस्था झाली आहे याचा पुरावा खुद्द महापालिकेच्या दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत समोर आला आहे. दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात केलेल्या रस्त्यांच्या पाहणीत तब्बल ९६ टक्के रस्ते वाईट अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. रस्ता तयार केल्यापासून तीन वर्षांच्या आतच हे रस्ते खराब झाल्याचे आढळून आले आहेत, हे विशेष.

खड्डे बुजवण्यासाठी एका बाजूला पालिकेने खड्डे दाखवा ५०० रुपये बक्षीस मिळवा, अशी योजना आणून एक प्रकारे मुंबईतील रस्ते चांगले नसल्याचेच मान्य केले आहे. पालिकेच्या दक्षता विभागाने केलेल्या रस्त्यांच्या पाहणी अहवालातही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीमध्ये हा अहवालच सादर केला. दक्षता विभागाच्या अभियंत्यांनी सप्टेंबरमध्ये शहरातील ३८, पश्चिम उपनगरातील ११८ व पूर्व उपनगरातील ३८ रस्त्यांची तपासणी केली. हे सगळे रस्ते हमी कालावधीतील होते. रस्ता तयार केल्यानंतर तीन वर्षांपर्यंत हमी कालावधी असतो. त्यात रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी त्या कंत्राटदारांची असते. परंतु, निकृष्ट काम आणि देखभालीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे नवीन रस्ते असूनही त्यांची दुरवस्था झाली होती.

५८ कंत्राटदारांपैकी ४१ कंत्राटदार यामध्ये दोषी आढळले असून त्यांनी कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आली आहे. दरम्यान, २०१५ मध्ये पालिकेने रस्ते विभागातील घोटाळ्याची चौकशी केली होती व दोषी कंत्राटदार आणि पालिकेचे अभियंते यांच्यावर कारवाई केली होती. मात्र त्यातून कंत्राटदार व अधिकारी यांनी काहीही शिकवण घेतलेली नाही, असा आरोप रवी राजा यांनी केला आहे. या ४१ कंत्राटदारांना यापुढे कोणतेही काम देऊ  नये, त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

रेतीचा वापर अधिक

दक्षता विभागाच्या पाहणीत रस्त्यांचा पृष्ठभाग, उपयोगिता वाहिन्यांसाठी खणलेले खड्डे, रस्त्यावरचे खराब पट्टे, पदपथ, मॅनहोलच्या आजूबाजूचा भाग यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १९४ पैकी १८७ रस्ते दुरवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. मॅनहोलच्या आजूबाजूचा भाग समपातळी नसणे, रस्ते ओबडधोबड असणे, पेव्हर ब्लॉक, लाद्या उखडणे, रस्त्यांचा पृष्ठभाग समपातळीत नसणे अशा गोष्टी आढळून आल्या आहेत. रस्ते तयार करण्यासाठी वापरले जाणारे मिश्रण योग्य नसल्याचे व त्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असल्याचा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.