Engineering Admissions Updates: मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीसाठी गुरूवारी सायंकाळी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पसंतीक्रम भरलेल्या १ लाख १९ हजार २३ विद्यार्थ्यांपैकी ९८ हजार ५५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये मिळालेल्या अल्प प्रतिसादानंतर तिसऱ्या फेरीला किती विद्यार्थी प्रवेश घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या झालेल्या दोन फेऱ्यांमध्ये १ लाख ८३ हजार जागांपैकी ६४ हजार ८४१ जागांवर प्रवेश झाले. त्यामुळे उरलेल्या १ लाख १८ हजार ९१९ जागांवरील प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी कक्ष) कक्षामार्फत तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. तिसऱ्या यादीसाठी १ लाख १९ हजार २३ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरला होता. पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९८ हजार ५५ विद्यार्थ्यांना जागा जाहीर झाल्या. यामध्ये पहिल्या सहा पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९ हजार ७०६ इतकी आहे. या यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना २२ ते २५ ऑगस्टदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे.

दुसऱ्या फेरीपर्यंत नामांकित संस्था आणि अपेक्षित शाखा मिळेल या आशेने अनेकांनी पसंतीक्रम फारसा बदलला नव्हता. त्यामुळे काही गुणवंतांना अपेक्षित प्रवेश मिळाले असले तरी कमी पर्सेंन्टाईल मिळालेले विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत होते. तिसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांनी नवीन पसंतीक्रम सादर केले होते. तसेच ‘उत्तम महाविद्यालया’ची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांनीही पसंतीक्रम भरले होते. त्यामुळे यावेळी अनेकांना अपेक्षित संस्था आणि शाखेत प्रवेश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमके किती विद्यार्थी प्रवेश घेणार यावरच आता अवलंबून आहे.

एमबीए अभ्यासक्रमाचीही तिसरी फेरी जाहीर

एमबीए अभ्यासक्रमाचीही तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. एमबीए अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीसाठी एमबीए अभ्यासक्रमाकरीता १५ हजार ५९३ जागा रिक्त होत्या. या जागांसाठी राज्यभरातून १३ हजार ८९३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरला हाेता. यातील १० हजार ३९० विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जागा जाहीर करण्यात आली आहे. एमबीए अभ्यासक्रमाच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये २८ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

अभियांत्रिकीच्या दोन फेऱ्यांमध्ये अल्प प्रतिसाद

अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीसाठी १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. मात्र फक्त ३४ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्याचप्रमाणे दुसऱ्या फेरीमध्ये १ लाख ६२ हजार २०५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. यातील फक्त २९ हजार ९१० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घेतला. दोन्ही फेऱ्यांमध्ये ६४ हजार ८४१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतल्याने पहिल्या दोन फेऱ्यांना विद्यार्थ्यांनी अल्प प्रतिसाद दिला.