मुंबई : शिवडी येथे ट्रेलरच्या अपघातात ३५ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. वंशराज रामगरीब कोरी (३५ वर्ष) मृत ट्रेलर चालकाचे नाव आहे. शिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलर दुभाजकाला धडकाला त्यावेळी ट्रेलरवर चार काउंटरवेट क्लॅम्प्स होते. त्यांची साखळी तुटून ते चालकाच्या केबिनवर पडले. त्याखाली सापडून चालकाचा मृत्यू झाला.
अपघातानंतर शिवडी अग्निशमन दल आणि भायखळा बचाव पथकाच्या आपत्कालीन मदत पथकाने कोरीला ढिगाऱ्यातून बाहेर काढले आणि परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असून याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्याच्या कलम १०६(१) आणि २८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.