चेंबूर परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरगाडीने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी चेंबूर पोलीस फॉर्च्युनर गाडीच्या चालकाचा शोध घेत आहेत.
हेही वाचा- मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मात्र दिलासा
गौरव नरोटे हा तरूण चेंबूर सुभाष नगर येथील रहिवासी आहे. तो खासगी गाड्यांवर चालक म्हणून काम करायचा. २७ ऑक्टोबरला पहाटे तो मित्रांना भेटण्यासाठी त्याच्या अॅक्टीवा स्कूटरवरून जात असताना विरुद्ध रस्त्यावरून येणाऱ्या फॉर्च्युनर गाडीने त्याला धडक दिली. त्यानंतर त्याला कोणतीही वैद्यकीय मदत न देता चालकाने तेथून पळ काढला.
हेही वाचा- राज्यात लवकरच सायबर गुप्तचर विभाग; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बी.के सांडू मार्ग येथील आयसीआयसीआय बँकेसमोर हा भीषण अपघात घडली. गाडीच्या भीषण धडकेनंतर दुचाकीस्वार तरुण रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसत असून त्याच्या मदतीसाठी दुसरा दुचाकीस्वार आल्याचे दिसते आहे. या अपघातात गौरवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर दुचाकीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. गौरवच्या बहिणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. गाडीच्या चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.