झारखंडमधील एका शिक्षण संस्थेने ११६ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जाच्या नावाने कुर्ल्यातील एका फायनान्स कंपनीची दीड कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोल आला आहे. या प्रकरणी झारखंडमधील शिक्षण संस्थेच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुर्ला रोड, टाईम्स स्केअर इमारतीमध्ये इडुव्हानस फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एक मुख्य कार्यालय असून तक्रारदार पांडुरंग तुकाराम काटे हे वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. या कंपनीकडून देशभरातील विविध शैक्षणिक संस्थेला विद्यार्थ्याकरिता शिक्षणासाठी कर्ज दिले जाते. कंपनीचे देशभरातील सर्वच शहरांत कामकाज चालत असून त्यांचे मुख्य कार्यालय अंधेरी येथे आहे.

हेही वाचा- थायलंडचा बोर्डिंग पास मिळवून लंडनला जाण्याचा प्रयत्न; परदेशवारीऐवजी सहा प्रवाशांची तुरुंगात रवानगी

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये काटे यांच्या कंपनीशी झारखंडमधील राची शहरातील बेसिक फर्स्ट प्रायव्हेट लिमिटेडचे विशेष कार्यकारी अधिकारी (सीईओ) रणधीरकुमार यांनी संपर्क साधला. या संस्थेत अनेक विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. काही विद्यार्थी शैक्षणिक शुल्क भरू शकत नसल्याने त्यांना त्यांच्या कंपनीने शैक्षणिक कर्ज द्यावे अशी विनंती करण्यात आली होती. तसेच ११६ विद्यार्थ्यांचे केवायसी कागदपत्रे सादर करून कर्जासाठी अर्ज केले होते. या अर्जाची शहानिशा केल्यानंतर कंपनीने रणधीरकुमार यांच्या कंपनीबरोबर एक करार केला होता. या करारानुसार त्यांच्या संस्थेच्या ११६ विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमासाठी एक कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र, विद्यार्थ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही तर या कंपनीला त्यांच्या कर्जाची परतफेड करावी लागेल, अशी अट घातली होती. ही अट मान्य केल्यानंतर त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या बँक खात्यात ११६ विद्यार्थ्यांचे एक कोटी ५३ लाख १८ हजार ७५६ रुपयांचे शैक्षणिक कर्ज हस्तांतरित करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला कर्जाचे हप्ते नियमित भरले. मात्र, नोव्हेंबर २०२१ पासून विद्यार्थ्यांनी कर्जाचे हप्ते भरणे बंद केले. त्यामुळे कंपनीच्यावतीने संबंधित विद्यार्थ्यांना दूरध्वनी करून कर्जाच्या हप्त्याविषयी विचारणा करण्यात आली होती. यावेळी या विद्यार्थ्यांनी आपण बेसिक फर्स्ट शैक्षणिक संस्थेकडून कुठलाही अभ्यासक्रम शिकत नसून कर्ज घेतले नाही असे सांगितले. ते फक्त तिथे चौकशीसाठी गेले होते. तसेच काही विद्यार्थ्यांनी त्यांना अभ्यासाचे साहित्य, लॅपटॉप व इतर शैक्षणिक सुविधा पुरविण्यात आल्याच नाही, असा आरोप केला होता. याबाबत तुकाराम काटे यांनी रणधीरकुमारसह इतर संचालकांना दूरध्वनी केला असता त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा- सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या महिलेस अटक; वाहतूक हवालदाराला शिवीगाळ करून वाद घातल्याचा आरोप

रणधीरकुमारसह इतर संचालकांनी बनावट कागदपत्र सादर करून विद्यार्थ्यांच्या विविध अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज घेऊन इडुव्हानस फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची फसवणूक केल्याचे लक्षात आले. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रणधीरकुमारसह इतराविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून लवकरच एमआयडीसी पोलिसांचे एक विशेष पथक झारखंडला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.