scorecardresearch

मुंबई : दीड कोटींचे दागिने घेऊन दोन नोकर पसार; सराफ व्यावसायिकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

तक्रारीनुसार आरोपींनी दोन किलो ७८९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पळवले असून त्याची किंमत दीड कोटी रुपये आहे.

मुंबई : दीड कोटींचे दागिने घेऊन दोन नोकर पसार; सराफ व्यावसायिकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

सराफाने विश्वासाने दिलेले दीड कोटी रुपयांचे दागिने घेऊन दोन नोकर पसार झाल्याचा प्रकार गिरगाव परिसरात घडला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सराफाने वि. प. रोड पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी याप्रकरणी दोन नोकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघेही राजस्थान येथील रहिवासी असून त्यांच्या शोध घेण्यासाठी लवकरच एक पथक राजस्थानला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा- मुंबई: तीन वर्षात मुंबई रेल्वे हद्दीत १६८ जणांनी केली आत्महत्या

निखील चंदुलाल चावडा (३६) यांचा घाऊक दरात सोन्याचे दागिने विकण्याचा व्यवसाय आहे. अनेक व्यापारी त्यांच्याकडून सोने खरेदी करतात. गिरगाव येथील विठ्ठलवाडी परिसरात त्यांचे कार्यलय आहे. सोन्याच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी चावडा ऑक्टोबरमध्ये नाशिकला जाणार होते. त्यासाठी ते कार्यालयात मोठ्या प्रमाणात दागिने घेऊन आले होते. चावडा ६ ऑक्टोबर रोजी जेवण्यासाठी गिरगावमधील एका हॉटेलमध्ये गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत कार्यालयात काम करणारे दोन नोकर लक्ष्मण रावल व रमेश रावल हेही होते. वि. प. रोड येथील एका व्यापाऱ्याला दागिने दाखवण्याचे निमित्त करून लक्ष्मण आणि रमेश हॉटेलमधून निघाले.

हेही वाचा- मुंबईः उपचाराच्या निमित्ताने वृद्धाची १० लाखांची फसवणूक; तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

त्या दोघांनी आपल्यासोबत सोन्याचे दागिने घेतले होते. मात्र बराच वेळ झाला तरी ते परतलेच नाहीत. चावडा यांनी मोबाइलवरून संपर्क साधताच आरोपी निरनिराळी कारणे सांगून टाळाटाळ करू लागले. त्यानंतर या दोघांनी आपापले मोबाइल बंद केले. अखेर चावडा यांनी याप्रकरणी वि. प. रोड पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार वि. प. रोड पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार आरोपींनी दोन किलो ७८९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पळवले असून त्याची किंमत दीड कोटी रुपये आहे. आरोपी मूळचे राजस्थानमधील रहिवासी आहेत. त्यामुळे लवकरच एक पथक राजस्थानमध्ये जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 18:14 IST

संबंधित बातम्या