मुंबईः वरळी येथील पंचतारांकीत हॉटेलला बॉम्बस्फोटाच्या धमकीबाबत ई-मेल प्राप्त झाला. याबाबतचा ई-मेल बुधवारी रात्री हॉटेलला प्राप्त झाला होता. या ई-मेलची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्वत्र तपासणी केली. आरोपीने ई-मेल पाठवण्यासाठी आऊटलूक ईमेल आयडीचा वापर केला असून तामिळनाडू पोलिसांना युनियन स्थापन करण्याची मागणी या ई-मेलमध्ये करण्यात आली आहे.
पोलीस महासंचालकांच्या कुलाबा येथील कार्यालातील नियंत्रण कक्षात गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास एक निनावी दूरध्वनी आला होता. मुंबईतील लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असून स्फोट घडविण्यात येणार असल्याची माहिती फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने दिली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील शाळा, शासकीय कार्यालये, दूतावास आदी बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या येत होत्या. त्यानंतर आता वरळीतील फोर सिझन हॉटेललाही धमकीचा ई-मेल आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आरडीएक्स व आईडीद्वारे बॉम्बस्फोट घडवण्यात येणार आहेत. त्यासाठी तीन व्हीआयपी खोल्या व इतर पाहुण्यांना बाहेर काढा, असे ई-मेलमध्ये नमुद करण्यात आले होते. ई-मेल प्राप्त झाल्यानंतर बुधवारी रात्री मध्य प्रादेशिक नियंत्रण कक्षाला याबाबत कळवण्यात आले. या ई-मेलमध्ये तामिळनाडू पोलिसांचा उल्लेख करीत त्यांना कामगार संघटना स्थापन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या ई-मेलमागे खोडसाळपणा असून पोलीस ई-मेल पाठवण्याऱ्यांचा शोध घेत आहेत.
आऊटलूक ई-मेलचा यापूर्वीही वापर
शहरातील शिक्षण संस्थांना धमक्यांचे सत्र सुरूच असून गेल्या तीन महिन्यांमध्ये १५ हून अधिक आंतरराष्ट्रीय शाळा व शैक्षणिक संस्थांना धमक्यांचे ई-मेल प्राप्त झाले आहेत. धमकीच्या ई-मेलसाठी स्वीडन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, नॉर्वे या देशांच्या व्हीपीएनचा वापर करण्यात आला आहे. आरोपींनी विविध ई-मेलद्वारे धमक्या पाठवल्या असल्या, तरी त्यातील मजकूर सारखाच असल्यामुळे या मागे एकाच व्यक्तीचा हात असल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, यापूर्वीही धमक्यांसाठी आऊटलूक ई-मेल आयडीचा वापर करण्यात आला आहे.