मुंबई : हार्बर मार्गावरील सीएसएटीकडे जाणाऱ्या लोकलने रे रोड स्थानकावर निश्चित थांबा ओलांडण्याची (प्लॅटफॉर्म ओव्हर शूटिंग) घटना शनिवारी घडली. थांबा असलेल्या ठिकाणी लोकल न थांबता फलाटापासून तीन डबे पुढे गेली. त्यानंतर पुन्हा लोकल मागे घेण्यात आली. या सर्व कृतीमुळे प्रवाशांमध्ये भितीची आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तसेच प्रवाशांनी धावत्या लोकलमधून फलाटावर उड्या घेतल्या.
शनिवारी सायंकाळी ६.५७ ची पनवेल-सीएसएमटी लोकल रात्री ८ च्या सुमारास रे रोड स्थानकाजवळ आली असता, या लोकलने निश्चित थांब्याच्या ठिकाणी थांबण्याऐवजी लोकलचे तीन डबे पुढे गेले. त्यामुळे तीन डब्यातील प्रवाशांना लोकलमधून उतरणे अवघड झाले. फलाटावर लोकल न थांबल्याने प्रवासी गोंधळले. यावेळी घटनास्थळी असलेल्या रेल्वे कर्मचारी, गार्ड यांच्या मदतीने मोटरमनने लोकल पुन्हा मागे घेण्याचा निर्णय घेतला. लोकल पुन्हा निश्चित थांब्याच्या ठिकाणी थांबवण्यात आली. पुढे गेलेली लोकल पुन्हा मागे आणून थांबवण्यास सुमारे ५ ते ६ मिनिटांचा कालावधी लागला. मात्र, सीएसएमटीला जाणारी लोकल पुन्हा मागे का जात आहे, असा प्रश्न प्रवाशांना पडला. त्यामुळे अनेक महिला प्रवासी घाबरून गेले. त्यांनी धावत्या लोकलमधून उडी घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही प्रवासी लोकल आणि फलाटाच्या पोकळीत पडण्याची धोका निर्माण झाला. तसेच अप दिशेची लोकल पुन्हा डाऊनने चालवणे खूप गंभीर प्रकार आहे. या घटनेमुळे मागून येणाऱ्या लोकल रखडल्या. मात्र इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कपणामुळे संभाव्य अपघात टाळता आला.
हेही वाचा >>>गरिबांची खिचडी खाणाऱ्याला उमेदवारी का? उबाठा गटाकडून अमोल किर्तीकरांचे नाव जाहीर होताच काँग्रेसची टीका
रे रोडला झालेल्या प्लॅटफाॅर्म ओव्हरशूटचे सीसीटीव्ही चित्रिकरण तपासण्यात आले. यावेळी लोकल वेगात आली आणि न थांबता सिग्नल ओलांडला. तसेच तिचे तीन डबे पुढे गेले. त्यानंतर तिला पुन्हा मागे घेऊन पाच मिनिटांच्या कालावधीनंतर पुन्हा सुरू करण्यात आले. यावेळी पाॅइंटमॅन सुरेंद्र कुमार शर्मा यांच्या सतर्कपणामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.