मुंबई: घरात एकट्याच असलेल्या ६४ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून चोरट्याने तिचे हात-पाय बांधून घरातील मौल्यवान वस्तूंची चोरी केल्याची घटना भांडुप परिसरात घडली आहे. घटनेनंतर बारा तास ही महिला हात-पाय बांधलेल्या अवस्थेत घरात पडून होती. याबाबत कांजूरमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

जयवंती वतनदार (वय ६४) असे या वृद्ध महिलेचे नाव असून त्या भांडुपगाव येथे त्यांच्या मुलासह राहतात. त्यांचा मुलगा शनिवारी रात्री बाहेर गेला होता. दरम्यान रविवारी पहाटे दोनच्या सुमारास अचानक त्यांच्या घरात एक चोरटा शिरला. त्याने महिलेचे हात-पाय बांधून तोंडालाही पट्टी बांधली. त्यानंतर घरातील कपाटात असलेले काही सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

हेही वाचा… कचऱ्याची पिशवी रस्त्यावर टाकणाऱ्या दुकानदाराला दंड; दादरमध्ये पालिकेची स्वच्छतेसाठी अनोखी शोधमोहीम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही हात-पाय आणि तोंडाला पट्टी बांधल्याने महिलेला काहीही हालचाल करता आली नाही. त्यामुळे बारा तास ही महिला घरात एकटीच पडून होती. त्यानंतर रविवारी दुपारी तीनच्या सुमारास महिलेचा मुलगा घरी परतल्यानंतर आईची ही अवस्था बघून त्याला धक्का बसला. त्याने तत्काळ आईला रुग्णालयात दाखल करून, कांजूरमार्ग पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.