विनाहेल्मेट दुचाकी चालविल्याप्रकरणी कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करणाऱ्या महिलेला दिंडोशी पोलिसांनी अटक केली. बिस्मिल्ला रेहमनुल्ला शेख असे या महिलेचे नाव असून ती सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा- महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करणार ‘पॅलेटिव्ह केअर’!

भाईंदरचे रहिवासी असलेले प्रमोद जनार्दन शिवकर दिडोंशी वाहतूक पोलीस चौकीत पोलीस हवालदार म्हणून काम करतात. सोमवारी दुपारी ३ वाजता ते गोरेगाव – मुलुंड जोड रस्त्यावरील ओबेरॉय पुलाजवळ कर्तव्यावर होते. सायंकाळी ६.१५ च्या सुमारास एक महिला दुचाकीवरून विनाहेल्मेट सिग्नल तोडून पुढे जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे शिवकर यांनी तिच्यावर कारवाई केली. यावेळी या महिलेने त्यांना दुचाकीचे छायाचित्र काढण्यास विरोध करून त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यांच्याशी अर्वाच्च भाषेत बोलून ती तेथून निघून गेली.

हेही वाचा- श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर शरद पवारांनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले, “फडणवीसांनी मागे…”

काही वेळानंतर पुन्हा ही महिला विरुद्ध दिशेने तेथे आली आणि आता कारवाई करा, असे सांगून ती प्रमोद शिवकर यांच्याशी पुन्हा हुज्जत घालू लागली. शिवीगाळ करून त्यांच्याशी वाद घालण्याचाही प्रयत्न तिने केला. शिवकर यांनी याबाबत वाहतूक नियंत्रण कक्षाला माहिती दिली. तसेच महिला कर्मचाऱ्याची मदत मागितली. काही वेळानंतर तिथे महिला कर्मचारी आली. तोपर्यंत ती महिला तेथून निघून गेली होती. हा प्रकार नंतर त्यांनी त्यांचे प्रभारी पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांना सांगितला. त्यांच्या आदेशानंतर त्यांनी दिडोंशी पोलीस ठाण्यात या महिलेविरुद्ध तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध शिवीगाळ करून पोलिसांशी हुज्जत घालणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या महिलेला अटक केली. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे.