मुंबई : एका तरुणाला मित्राने कामाला लावले होते. मात्र मालकाने त्याचा ५ हजार रुपये पगार थकवला. यामुळे संतापलेल्या तरुणाने मालकाऐवजी मित्रावरच कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. कांदिवली येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी तरूणाला अटक केली आहे.
फिर्यादी दीपक दुबे (४१) कांदिवली पश्चिमेच्या मथुरादास रोडवरील भरत विला इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. काही वर्षांपूर्वी त्याने ललित तिवारी (२६) या मित्राला एका एजन्सीमार्फत कामाला लावले होते. ललित करोना काळात २०२२ मध्ये काम सोडून उत्तर प्रदेश येथील मूळ गावी निघून गेला होता. तो मध्येच काम सोडून गेल्याने मालकाने त्याच्या पगारातील ५ हजार रुपये बाकी ठेवले होते. मालकाकडून पाच हजार रुपये मिळवून दे, असा तगादा ललितने फोनवरून सतत दीपक दुबेकडे लावला होता.
नुकताच ललित तिवारी गावाहून परतला होता. तो रविवारी सकाळी कांदिवली पश्चिम येथील मथुरादास रोड वरील भरत विला इमारतीत दीपक दुबेला भेटायला गेला. पगारातील शिल्लक राहिलेले पाच हजार रुपये देण्याची मागणी त्याने दुबेकडे केली. मात्र त्या एजन्सीच्या मालकाकडून पैसे घे असे दुबेने त्याला सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून तिवारीने दुबेच्या डोक्यावर, हातावर आणि पोटावर कोयत्याने पाच ते सहा वार केले. गंभीर जखमी दीपक दुबेला उपचारासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी आरोपी ललित तिवारीला अटक केली. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१), ३५२, तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम ३७ (१) (अ) आणि १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि आरोपी हे दोघे मित्र होते.
फिर्यादीने आरोपी तरुणाला कामाला लावले होते. पगारातील थकीत पाच हजार रुपयांवरून त्यांच्यात वाद झाला आणि आरोपीने हल्ला केला होता, अशी माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांनी दिली.