ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी संध्याकाळी केलेल्या एका ट्वीटवरून आज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. संजय राऊतांनी मंत्री दादा भुसेंवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करणारं एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटवर दादा भुसेंनी आज विधानसभेत निवेदन सादर केलं. यावेळी दादा भुसे यांनी संजय राऊतांचा उल्लेख महागद्दार असा केला.
दादा भुसे यांनी संजय राऊतांचा उल्लेख महागद्दार केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यांनी अन्नाची शपथ घेऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
दादा भुसेंच्या टीकेबद्दल विचारलं असता आदित्य ठाकरेंनी अगदी थोडक्यात उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “हे बघा, गद्दार काहीही बोलतील. ज्यांनी अन्नाची शपथ घेऊन आमच्याच पाठीत खंजीर खुपसला, त्यांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही. जे लोक एवढं खोटं बोलतात, यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हा प्रश्न आहे. हे गद्दारच आहेत.”
हेही वाचा- “आता बोलायची वेळ आलीय, कारण…”; बीडमध्ये पंकजा मुंडेंचं थेट विधान, नेमका रोख कुणाकडे?
संजय राऊतांनी नेमका आरोप काय केला?
संजय राऊतांनी दादा भुसेंवर गिरणा अॅग्रोच्या नावाने लूट केल्याचा आरोप केला. “हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्याविरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अॅग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले गेले. पण कंपनीच्या वेबसाईटवर मात्र फक्त १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स आहेत. तेही फक्त ४८ सभासदांच्या नावावर दाखवण्यात आले आहेत. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल“, असं राऊत ट्वीटमध्ये म्हणाले.
दादा भुसेंनी काय प्रत्युत्तर दिलं?
“जर मी दोषी आढळलो तर आमदारकीचा, मंत्रीपदाचा नव्हे, राजकारणातून निवृत्त होईन. यात खोटं आढळून आलं, तर आमच्याच मतांवर निवडून आलेल्या या महागद्दारानेही राज्यसभेच्या खासदारकीचा, सामनाच्या संपादकपदाचा राजीनामा द्यावा. हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीची, माननीय शरद पवारांची करतात. आणि हे आम्हाला शिकवतात. २६ तारखेपर्यंत जर त्यांनी माफी मागितली नाही, तर मालेगावचे शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत”, असं दादा भुसे म्हणाले.