मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ भुयारी मार्गिकेतील आरे – बीकेसी मेट्रो टप्पा वाहतूक सेवेत दाखल होत असल्यामुळे मुंबईकरांना एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र महाविकास आघाडीने ‘मेट्रो ३’ प्रकल्पास विरोध करीत कारशेडचे काम रोखून धरले. त्याचा ‘मेट्रो ३’ प्रकल्पावर परिणाम झाला. प्रकल्पाला विलंब झाल्यामुळे खर्च १४ हजार कोटी रुपयांनी वाढला. केवळ विरोधकांच्या भूमिकेमुळे खर्चात भरमसाठ वाढ झाल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. त्याचवेळी हा प्रकल्प यशस्वीरित्या पुढे नेणाऱ्या राज्य सरकारचे तोंड भरून कौतुक केले.

‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानच्या १२.५ किमीच्या टप्प्याचे लोकार्पण शनिवारी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाण्यातील विकास कामांच्या लोकार्पण, पायाभरणी कार्यक्रमात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा – मुंबई : वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून संगणकाची तोडफोड, आरोपीला अटक

मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या (एमएमआरसी) माध्यमातून ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेचे काम करण्यात येत आहे. या ३३.५ किमी मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्पा एमएमआरसीने पूर्ण केला असून या टप्प्यासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून बुधवारी सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले. आरे – बीकेसी अंतर एक तासऐवजी केवळ २२ मिनिटांत पार करता येईल अशा या भुयारी मेट्रो टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधानांनी शनिवारी केले. ही मेट्रो मार्गिका भारत आणि जपानच्या मैत्रीपूर्ण संबंधाचे प्रतिक आहे. जपानाच्या मदतीमुळे हा प्रकल्प मार्गी लावणे सोपे झाले, असे सांगत पंतप्रधानांनी यावेळी ‘जायका’चे कौतुक केले. त्याचवेळी मेट्रो ३ च्या खर्चवाढीला विरोधकांना जबाबदार धरत त्यांच्यावर टीका केली. विरोधक सत्तेत असताना त्यांनी केवळ विकास प्रकल्प रोखण्याचे काम केले. ‘मेट्रो ३’ प्रकल्पातील कारशेडलाही विरोध केला. मेट्रो प्रकल्प, कारशेड रोखून धरले. परिणामी मेट्रो ३ च्या खर्चात १४ हजार कोटी रुपयांनी वाढ झाली. हा पैसा करदात्यांचा आहे. त्यामुळे या खर्च वाढीला केवळ विरोधक जबाबदार असल्याची टीका यावेळी पंतप्रधानांनी केली.

दरम्यान, आता आरे – बीकेसी टप्प्याचे लोकार्पण झाल्याने मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकार्पणानंतर लागलीच ही मेट्रो सेवेत दाखल होईल असे वाटत होते. मात्र एमएमआरसीने सोमवारपासून भुयारी मेट्रोचा आरे – बीकेसी टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सोमवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो धावणार असून मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

पंतप्रधानांची भुयारी मेट्रो सफर

ठाण्यातील विकास कामांचे लोकार्पण आणि पायाभरणीचा सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान बीकेसीत दाखल झाले. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पंतप्रधानांनी बीकेसी – सांताक्रुझ मेट्रो स्थानकांदरम्यान प्रवास केला. यावेळी त्यांच्याबरोबर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी मजूर आणि विद्यार्थी होते. पंतप्रधानांनी भुयारी मेट्रो सफरीदरम्यान या सर्वांशी संवाद साधला.

पूर्वमुक्त मार्गाचा ठाण्यापर्यंत विस्तार

ठाण्यातील विकास कामांच्या लोकार्पण आणि पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) छेडा नगर – ठाणे पूर्वमुक्त मार्गाचे (विस्तारीत) भूमिपूजन करण्यात आले. मुंबई – ठाणे प्रवास अतिवेगवान करून मुंबई, ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएनेहा प्रकल्प हाती घेतला आहे. सहा मार्गिकांचा आणि १३ किमी लांबीचा हा विस्तारित असा पूर्वमुक्त मार्ग असणार असून या कामाचे कंत्राट मे. नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीला मिळाले आहे. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याची सर्व कार्यवाही पूर्ण झाल्याने आचारसंहितेपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता. त्यानुसार शनिवारी ठाण्यातील कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.

तिकीट दर असे

आरे जेव्हीएलआर – सीप्झ – १० रुपये

आरे जेव्हीएलआर – एमआयडीसी, मरोळ – २० रुपये

आरे जेव्हीएलआर – सहार रोड, विमानतळ टी १ – ३० रुपये

आरे जेव्हीएलआर – सांताक्रुझ, वांद्रे शासकीय वसाहत – ४० रुपये

आरे जेव्हीएलआर – बीकेसी – ५० रुपये

१० ते ७० रुपये दर

आरे जेव्हीएलआर – कफ परेड तिकीट दर ७० रुपये

आरे – बीकेसी टप्प्यातील मेट्रो स्थानके

आरे जेव्हीएलआर, सीप्झ, एमआयडीसी अंधेरी, मरोळ नाका, विमानतळ टी २, सहार रोड, विमानतळ टी २, सांताक्रुझ, वांद्रे शासकीय वसाहत, बीकेसी.

वेळापत्रक

सोमवार ते शनिवार सकाळी ६.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत भुयारी मेट्रो सेवा सुरू राहील

रविवारी सकाळी ८.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत सेवा सुरू राहील

सोमवार, ७ ऑक्टोबरपासून आरे – बीकेसी टप्पा प्रवाशांसाठी सुरू होईल. सकाळी ११ वाजल्यापासून मुंबईकरांचा भुयारी मेट्रो प्रवास सुरू होईल

दररोज ९६ फेऱ्या

मेट्रो गाडी दर साडेसहा मिनिटांनी सुटेल. पहिली गाडी सकाळी ६.३० वाजता, तर शेवटची गाडी रात्री १०.३० वाजता सुटेल. आरे – बीकेसीदरम्यान ९ मेट्रो गाड्या धावतील. या मार्गिकेवर ४८ मेट्रो पायलट सेवा देतील, यात १० महिला मेट्रो पायलटचा समावेश आहे. वातानुकूलित आणि स्वयंचलित, वाहनचालकमुक्त मेट्रो गाडी असली तरी गाडीत मेट्रो पायलट असणार आहे, ताशी ३५ किमी वेगाने भुयारी मेट्रो धावणार आहे.

हेही वाचा – मुंबई : वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून संगणकाची तोडफोड, आरोपीला अटक

आरे – बीकेसी अंतर २२ मिनिटांत पार होणार. सध्या हे अंतर पार करण्यासाठी किमान एका तासाचा अवधी लागतो. आठ डब्ब्यांच्या मेट्रो गाड्या असून २५०० प्रवासी क्षमतेच्या गाड्या आहेत. सध्या आरे – बीकेसी मार्गिकेवरून दिवसाला साडेचार लाख प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीकेसी – कफ परेड टप्पा केव्हा?

‘मेट्रो ३’ प्रकल्पातील बीकेसी – कफ परेड या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला ‘एमएमआरसी’ने वेग दिला आहे. दरम्यान, बीकेसी – वरळी आणि वरळी – कफ परेड अशा टप्प्यात काम करून ते वाहतूक सेवेत दाखल करण्याचे ‘एमएमआरसीएल’चे नियोजन होते. पण आता मात्र यात बदल करून ‘एमएमआरसीएल’ने बीकेसी – कफ परेड असा दुसरा टप्पा निश्चित केला आहे. त्यानुसार या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग दिला आहे. आतापर्यंत या टप्प्याचे ८६ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे ‘एमएमआरसीएल’चे नियोजन आहे. तर काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र घेऊन हा टप्पा मे २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोतून आरे – कफ परेड भुयारी प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना मे २०२५ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.