४० हजार लोकवस्तीसाठी एकच डॉक्टर
शाळेत येण्यासाठी बसने प्रवास करत असताना एका विद्यार्थ्यांच्या बोटाला इजा झाली. त्याच्यावर उपचार करण्यासाठी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तेथे साहित्या अभावी आवश्यक ते उपचार मिळाले नाही आणि त्या विद्यार्थ्यांला तब्बल पाऊण तासाच्या अंतरावर असलेल्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले. ही घटना राज्याच्या ग्रामीण भागातील नसून मुंबईतील आहे. येथील आरे वसाहतीमधील २५ ते २६ आदिवासे पाडे आहेत. मात्र त्यांच्यासाठी केवळ एकच रुग्णालय आहे. तेही ठरावीक अल्पशा वेळेत आणि तुटपुंज्या सुविधांसह कार्यरत आहे. जर रुग्णांना काही अधिक वैद्यकीय गरज भासल्यास लांबच्या रुग्णालयात जाण्यासाठी साधी रुग्णवाहिकाही उपलब्ध नाही. यामुळे येथील ३० ते ४० हजार लोकवस्तीचे ‘आरोग्य’ धोक्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते शैलेश पार्टे यांनी आरे दुग्ध वसाहतीच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे याबाबत माहिती मागविली होती. आदिवासी पाडय़ात विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करणाऱ्या पार्टे यांना येथील नागरिकांच्या आरोग्यसेवेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या भागात पाणी उकळून पिण्याबाबत जागरूकता नसल्याने तेथे पोटाचे विकार याचबरोबर ताप याचे रुग्ण सर्वाधिक आढळतात. तसेच या भागात टीबीचे रुग्णही असल्याचे निरीक्षण पार्टे यांनी नोंदविले. या भागातील पाडय़ांमध्ये असलेल्या सुमारे ४० हजार नागरिकांना उपचारांसाठी अनेकदा जोगेश्वरी अथवा गोरेगाव परिसरातील रुग्णालयांत जावे लागते. या भागातील रुग्णालये पाडय़ांपासून पाऊण तासांच्या अंतरावर आहेत. तसेच पाडय़ांमध्ये अनेक जण हे रोजंदारीवर काम करून आपले पोट भरणारे असल्यामुळे त्यांच्याकडे प्रवासासाठीही पैसे नसतात. अशा परिस्थितीत उपचार घेणे त्यांच्यासाठी अवघड होत असल्याचेही पार्टे यांनी नमूद केले. याचबरोबर या भागात लवकरात लवकर अद्ययावत रुग्णालय उभारावे अशी मागणीही पार्टे यांनी केली आहे. या संदर्भात आरे दुग्ध वसाहत कार्यालयाशी संपर्क साधला असता मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र हे रुग्णालय पालिकेच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते
एकच रुग्णालय तेही सुविधाविना
आरे वसाहतीमध्ये आदिवासी पाडय़ांसाठी आरे दुग्ध वसाहतीचे एक रुग्णालय आहे. या रुग्णालयात केवळ एक बीएएमएस डॉक्टर कार्यरत आहे. त्याच्या मदतीला एक परिसेविका, ४ परिचारिका, १ औषधतज्ज्ञ आणि अन्य १० कर्मचारी कार्यरत आहेत. एवढय़ा कर्मचाऱ्यांसह हे रुग्णालय सकाळी १० ते दुपारी ४ या वेळातच कार्यरत असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात समोर आली आहे. यानंतरच्या कालावधीत रुग्णालयात एकही डॉक्टर उपलब्ध नसतो. हे रुग्णालय एक परिचारिका व दोन चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यांच्या भरवशावर असल्याची माहितीही समोर आली आहे.
