मुंबई : मासेमारी बंदराचा मुंबई परवाना रद्द करून अलिबाग येथे हस्तांतरित करण्यासाठी १५ हजारांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली सहाय्यक आयुक्त पुल्लकेश कदम व सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी नीरज चासकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. या कारवाईत खासगी व्यक्ती संजय धनाजी कोळी यांना अटक करण्यात आली.एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांची स्वतःची मासेमारीची फायबर बोट असून मासेमारीसाठी मुंबई शहराचा बंदर परवाना आहे.

तक्रारदार यांनी पूर्वीचा मासेमारी बंदराचा मुंबई परवाना रद्द करून, सदर बंदर परवाना अलिबाग येथे हस्तांतरित करण्यासाठी ९ ऑक्टोबर २०२३ रोजी सहाय्यक आयुक्त, मस्त्यव्यवसाय कार्यालयात अर्ज केला होता. जानेवारी २०२५ पर्यंत आवश्यक कागदपत्रांची तक्रारदारांनी पूर्तता करूनही अद्यापपर्यंत काम प्रलंबित आहे. दरम्यान, कार्यालयातील खासगी व्यक्ती कोळीने १९ फेब्रुवारी रोजी तक्रारदारांच्या मोबाइलवर संपर्क साधला आणि उद्या कार्यालयात येऊन कदम आणि चासकर यांना १५ हजार रुपये द्या, त्यानंतर तुमचे काम होईल, असे सांगितले. तक्रारदारांनी २० फेब्रुवारी रोजी एसीबीकडे धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पडताळणीत कोळीने तक्रारदारांच्या कामासाठी कदम यांना पाच हजार रुपये, तर चासकर यांना दहा हजार रुपये देण्याबाबत प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे तात्काळ रचण्यात आलेल्या सापळ्यात कदम यांना पाच हजार रुपये तर चासकर यांना दहा हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच, कोळीलाही ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७, १२ अन्वये गन्हा नोंदवत अटकेची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.