मुंबई : देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागामध्ये नोंदणीसाठी आभा कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने घेतला आहे. त्यामुळे आता सर्व नागरिकांना आभा कार्ड काढणे आवश्यक आहे. रुग्णालयांचे मूल्यांकन, रुग्ण आणि संबंधित वैद्यकीय सामग्रसाठी आभा कार्डची नोंदणी ग्राह्य धरली जाणार आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या नुकत्याच झालेल्या १४ व्या बैठकीमध्ये देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, अपघात विभाग आणि आपत्कालिन विभागामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या पूर्वनोंदणीसाठी आभा कार्ड आवश्यक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांची नोंदणी करताना रुग्णालयातील नोंदणी क्रमांकाबरोबरच आभा कार्ड क्रमांकही आवश्यक असणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या वाढीव जागा, नवीन महाविद्यालये, विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी परवानगी, वार्षिक नूतनीकरण यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी रुग्णालयामधील रुग्णांची संख्या आणि उपचारासाठी उपलब्ध असणारी साधनसामग्री विचारात घेणे महत्त्वाचे असते. यासाठी रुग्णांची प्रमाणित नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे आभा कार्ड रुग्ण नोंदणीसाठी आवश्यक करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

हेही वाचा : मुंबई: ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील स्थानकांजवळ आणखी २६०० झाडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आभा कार्ड बनविण्याची प्रक्रिया सुलभ असून, आधार कार्डच्या सहाय्याने आभा कार्ड बनवणे सोपे आहे. तसेच आजघडीला नागरिकांकडे आभा कार्ड उपलब्ध असल्याने ही प्रक्रिया राबवणे सोपे जाईल. त्यामुळे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आणि त्यानंतरच्या मूल्यांकनातील निर्णयांसाठी, रुग्ण आणि संबंधित वैद्यकीय सामग्रीसाठी आभा कार्ड नोंदणी ग्राह्य धरली जाणार आहे. दरम्यान, आभा कार्डशिवाय कोणत्याही रुग्णाला उपचारापासून वंचित ठेवण्यात येऊ नये, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.