अभिनेता सलमान खानच्या घरावर दोन व्यक्तींनी गोळ्या झाडल्याचं प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे कारवाईला सुरुवात केली आहे. बिष्णोई गँगनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा वाढवली आहे. यासंदर्भात अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी केलेली इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलतानाही तेजस्वी घोसाळकर यांनी आपली व्यथा मांडली आहे.

दोन महिन्यांपूर्वी ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नरोन्हा नामक व्यक्तीने फेसबुक लाईव्हमध्येच गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांकडून तपास चालू आहे. यासंदर्भात चौकशी चालू असतानाच सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा अभिषेक घोसाळकर प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

तेजस्वी घोसाळकर यांनी मांडली व्यथा

यासंदर्भात तेजस्वी घोसाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याचं दु:ख आहे. या गोष्टीचा सार्थ अभिमानही आहे की पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज बाहेर काढलं, तपास चालू केला, आरोपीला पकडलं. सलमान खानच्या बाबतीत इतकी कार्यक्षम कार्यवाही केली. मग अभिषेक घोसाळकरांच्या प्रकरणात अशी कारवाई का होत नाहीये? आम्ही स्वत: त्या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज दिलं आहे. तरीही कारवाई का होत नाही? आम्ही यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी करणार आहोत”, असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.

“सलमान खानच्या प्रकरणात क्राईम ब्रांचचे सर्व विभाग तपास करत असताना मॉरिस नूरान्हानं अभिषेक घोसाळकरांच्या केलेल्या हत्येचं प्रकरण मात्र बाजूला पडलं आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. विशेषत: या प्रकरणात तिसऱ्या कुणाचातरी हात असल्याचा संशय बळावत असताना हे घडत आहे”, अशा शब्दांत तेजस्वी घोसाळकर यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये मुद्दा उपस्थित केला आहे.

घरावर गोळीबार झाल्यावर सलमान खानचा मोठा निर्णय, अभिनेत्याने सांगितलं की कोणीही आता…

“व्यवस्थेनं सर्वांना एकसमान संरक्षण पुरवावं”

“याहून धक्कादायक बाब म्हणजे माझ्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जात आहे. माझ्या जीविताला धोका असताना सलमान खानप्रमाणेच मलाही सुरक्षा का पुरवण्यात येत नाही? जर एखाद्या सेलिब्रिटीच्या सुरक्षेसाठी व्यवस्था उभी राहू शकते, तर मग मी भीतीच्या छायेखाली का राहावं? अशा प्रकारे दोन प्रकरणांना वेगवेगळ्या प्रकारे हाताळण्याच्या पद्धतीमुळे आपल्या न्याय प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि कार्यक्षमतेबाबत चिंता वाटू लागली आहे. व्यवस्थेनं नागरिकांचा सामाजिक दर्जा बाजूला सारून सर्वांचं एकसमान पद्धतीने संरक्षण करायला हवं”, असंही तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.