दारिद्रय़ रेषेवरच्यांनाही साखर, तेल स्वस्त मिळणार?
राज्यातील शिधावाटप दुकानांमध्ये निकृष्ट धान्य मिळत असल्याने ते खरेदी करण्याचे प्रमाण ४० ते ६० टक्क्य़ांवर आहे. त्यापैकी काही टक्के धान्य काळ्या बाजारात जात असून या पाश्र्वभूमीवर राज्यात १ फेब्रुवारीपासून ‘अन्नसुरक्षा’ योजना सुरू होणार आहे. अतिशय स्वस्त दरात धान्य मिळणार असल्याने शिधापत्रिकाधारक ते खरेदी करतील, असा विश्वास सरकारला वाटतो आहे. निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर पामतेल आणि साखरही दारिद्रय़रेषेवरील (एपीएल) शिधापत्रिकापत्रिकाधारकांना देण्यासाठी पावले टाकली जाण्याची शक्यता आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी त्यास दुजोरा दिला.
या योजनेचा शुभारंभ केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींच्या उपस्थितीत ३१ जानेवारी रोजी नवी मुंबईतील ऐरोली येथील पटणी ग्राऊंड येथे होणार आहे.
राज्यातील ११ कोटी २३ लाख जनतेपैकी सात कोटी जनतेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. अंत्योदय योजनेतील कुटुंबाला दरमहा ३५ किलो धान्य मिळेल. तर अन्य लाभार्थीना प्रत्येक व्यक्तीमागे दरमहा पाच किलो धान्य मिळेल. प्रतिकिलो गहू दोन रुपये, तांदूळ तीन रुपये तर भरड धान्य एक रुपया दराने मिळेल.
महिला कुटुंबप्रमुखाचे छायाचित्र असलेली संगणकीकृत बारकोड असलेली शिधापत्रिका प्रत्येक कुटुंबाला दिली जाईल. राज्यात दरमहा ८०० कोटी रुपयांचे चार लाख मे.टन धान्य अत्यंत अल्पदरात वितरीत केले जाणार आहे. या योजनेबाहेरील एक कोटी ७७ लाख कार्डधारकांना सध्याच्या प्रमाण व दरानुसार धान्य पुरविले जाईल, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
या योजनेसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च करून १३.५ लाख मे.टन साठवणूक क्षमतेची ६११ नवीन गोदामे बांधण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला असून हे काम पूर्ण होत आल्याचेही त्यांनी सांगितले.
लाभार्थीने प्रतिज्ञापत्र करून दाखविलेले उत्पन्न खरे मानून त्याला त्यानुसार कार्ड देऊन या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2014 रोजी प्रकाशित
निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सरकार उदार!
राज्यातील शिधावाटप दुकानांमध्ये निकृष्ट धान्य मिळत असल्याने ते खरेदी करण्याचे प्रमाण ४० ते ६० टक्क्य़ांवर आहे. त्यापैकी काही टक्के धान्य काळ्या बाजारात जात असून या पाश्र्वभूमीवर राज्यात १ फेब्रुवारीपासून ‘अन्नसुरक्षा’ योजना सुरू होणार आहे.
First published on: 25-01-2014 at 02:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Above poverty line people will get cheap sugar and oil