अथक प्रयत्नांनंतरही हाजी अली दर्ग्यात प्रवेश न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यास निघालेल्या भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्त देसाई यांना गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास दाखल झाल्या होत्या. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव तृप्ती देसाईंना मुंबई पोलिसांनी दर्ग्याच्या प्रवेशद्वाराबाहेरच रोखले. दर्ग्याबाहेर मोठी गर्दी झाली होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी सर्व खबरदारी घेतली. दर्ग्याबाहेर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी देखील आपल्या समर्थकांसह देसाईंना विरोध करण्यासाठी उपस्थित होते. हाजी अलीच्या प्रवेशद्वारावरच दर्गा समर्थक ठाण मांडून होते. पोलिसांच्या वाटाघाटीनंतरही तृप्ती देसाई यांना दर्ग्यात सध्या महिलांना प्रवेश असलेल्या विशिष्ट मर्यादीत ठिकाणापर्यंत जाण्यास देखील विरोध करण्यात आला. दर्ग्यात प्रवेेश दिला जात नसल्याने रात्री साडेसातच्या सुमारास देसाई यांनी आपला मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याच्या दिशेने वळवला. दर्ग्यात प्रवेश न दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देसाई यांनी दिला. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतले आहे.

वाचा: तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात आल्यास त्यांना चपलेचा प्रसाद देऊ- हाजी अराफत शेख

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यातील महिलांना असलेल्या प्रवेश बंदी विरोधात आंदोलन करण्याचे ठरविल्यानंतर गुरूवार सकाळपासूनच परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख देखील याठिकाणी पोहोचले होते. तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना धक्के मारून बाहेर काढू, असा इशारा अबू आझमी यांनी दिला होता. मंदिर प्रवेशाचा मुद्दा करत तृप्ती देसाई केवळ प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणताही आदेश येऊ दे आम्ही ऐकणार नाही. देसाईंना धक्के मारून बाहेर काढू, असा धमकी वजा इशारा अबू आझमी यांनी दिला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.