जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलातील पबमध्ये एका जोडप्याला प्रवेश नाकारण्यात आला. भारतीयांना प्रवेश नाही, असे कारण पब व्यवस्थापकाने दिल्याचा आरोप या जोडप्याने केला आहे. या पब व्यवस्थापकावर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.
जेनिफर चौहान आणि सोनू मलिक हे दोघे शनिवारी रात्री उपनगरातील एका प्रख्यात पंचतारांकित हॉटेलातील पबमध्ये गेले होते. तिथे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. यावरून पब व्यवस्थापक आणि या जोडप्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे जेनिफरने पोलिसांना फोन करून बोलावले. पोलिसांनी पबमधील पार्टी बंद केली. भारतीयांना या पबमध्ये प्रवेश नाही, असे कारण देऊन प्रवेश नाकारल्याचा आरोप जेनिफरने केला. सांताक्रुझ पोलिसांनी नागरिकांचे हक्क संरक्षण कायदा १९५५ चे कलम ४ अन्वये पब व्यवस्थापक आणि कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.
मात्र कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, आमच्या पबमधील ग्राहकांची यादी आधीच ठरलेली असते. संबंधित जोडपे या यादीत नव्हते म्हणून त्यांना प्रवेश दिला नाही. तसेच आमच्याकडचे ग्राहक बहुतांश भारतीयच असतात. त्यामुळे या जोडप्याचे आरोप निराधार असल्याचे पबतर्फे सांगण्यात आले.
संबंधित पब यापूर्वी देखील वादात सापडला होता. एका अभिनेत्याने हिंदी गाण्याचा आग्रह केल्याने येथे हाणामारीचा प्रकार घडला होता.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jul 2015 रोजी प्रकाशित
पंचतारांकित पबमध्ये जोडप्याला प्रवेश नाकारला
जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलातील पबमध्ये एका जोडप्याला प्रवेश नाकारण्यात आला. भारतीयांना प्रवेश नाही
First published on: 27-07-2015 at 07:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Access deny to couple