मुंबई : दहिसर येथे सरावादरम्यान ११ वर्षीय लहान गोविंदाचा सहाव्या थरावरून पडून मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे. कायद्यानुसार १४ वर्षाखालील मुलांना गोविंदा पथकात सहभागी होण्यास बंदी आहे. मात्र, मुंबईतील अनेक पथकांकडून या नियमाचे उल्लंघन केले जात असून सर्वात वरच्या थरावर लहान मुलांनाच चढवले जाते. कायदा, न्यायालयाचा निर्णय आणि बालकांची सुरक्षा सर्व धाब्यावर बसवून चालणाऱ्या या प्रकारांमुळे गोविंदांच्या जिवाशी खेळ होत आहे.
राज्यभर साजऱ्या होणाऱ्या दहिहंडीचा उत्साह त्यातील अर्थकारणामुळे शिगेला पोहोचला आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात हंडी फोडण्यासाठी असलेली लाखो रुपयांची बक्षिसे आणि अधिकाधिक उंच मनोरे रचण्याची मंडळांची स्पर्धा गोविंदांच्या जिवावर बेतत आहे. उत्साहाचा अतिरेक आणि पथकांच्या बेफिकीरीमुळे अनेक गोविंदांना आयुष्यभर अपंगत्वाला सामोरे जावे लागते आहे. दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी दहीहंडीचा सराव सुरू असताना सहाव्या थरावरून कोसळून महेश जाधव (११) या मुलाचा मृत्यू झाला. सरावादरम्यान कोणत्याही संरक्षण साधनांचा वापर करण्यात आला नसल्याचे या प्रकरणी समोर आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, १४ वर्षाखालील मुलांना गोविंदा पथकांमध्ये सहभागी होण्यास बंदी आहे. मात्र, असे असतानाही मुंबईतील शेकडो गोविंदा पथके न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे दिसते आहे. सध्या गल्लोगल्ली सुरू असलेल्या छोट्या गोविंदापथकांपासून ते अगदी दरवर्षी नवे वक्रिम रचणाऱ्या नामांकित पथकांपर्यंत सगळीकडे मानवी मनोऱ्याच्या वाढत्या उंचीबरोबर गोविंदांचे वय घटताना दिसते. अगदी सर्वांत वरच्या थरावर सर्रास लहान मुलांना चढवले जाते. अगदी आठ, नऊ वर्षांची मुलेही या खेळात दिसतात.
गोविंदांचे वय चोरीला…
न्यायालयाच्या आदेशांनंतर बालगोविंदांबाबत मंडळांसमोर पेच उभा राहिला. अगदी वरच्या थरावर चढणारी व्यक्ती वजनाने कमी असणे आवश्यक असते. त्यामुळे लहान मुलांना सहभागी करून घेतले जाते. बालकांचा वापर होत नाही ना याकडे लक्ष ठेवण्याची सूचना न्यायालयाने पोलिसांवर सोपवली. अगदी वरच्या थरावर चढलेला गोविंदा डोळ्यांना लहान असल्याचे दिसत असले तरी त्याचे कागदोपत्री वय १४ पेक्षा अधिक असल्याचे दिसते. वयाबाबत खोटे पुरावे सादर करून लहान मुलांचा वापर केला जातो. त्यामुळे कायद्याचा धाक, न्यायालयाचे आदेश, पोलिसांची भिती या सगळ्यातून गोविंदा पथके कारवाईच्या कचाट्यातून अलगद निसटत असल्याचे दिसते. सध्याही सरावादरम्यान लहानमुलांचा सहभाग सर्रास दिसत असूनही कारवाई का होत नाही हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
सुरक्षा वाऱ्यावर
बालगोविंदाच नाही तर मोठ्या गोविंदांच्या सुरक्षेकडेही मंडळांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मंडळे हंडी फोडून लाखो हजारो रुपयांची बिदागी, बक्षिसे मिळवतात. मात्र गोविंदांची सुरक्षा हा मुद्दा मंडळे गांभिर्याने घेत असल्याचे दिसत नाही. सरावादरम्यान जाड गाद्या, सुरक्षा जाळी, हेल्मेट, गुडघे-कपाळ संरक्षक पॅड, ग्रिप असलेले शूज आदी साधने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतात. मात्र, सरावादरम्यान त्यांचा वापर फारसा होताना दिसत नाही. मोठी पथके याबाबतीत काहिशी सजग असल्याचे दिसते. मात्र, लहान पथके, अगदी आपल्या मंडळापुरते मनोरे रचणारी पथके सुरक्षेबाबत बेफिकीर असल्याचे दिसते.
असोसिएशनचे काय म्हणणे?
आमच्याकडे सुमारे १२०० गोविंदा पथकांची नोंद आहे. तसेच, १४ वर्षांखालील मुलांचा दहीहंडीसाठी पथकात समावेश करू नये. गोविंदा पथकांनी जेवढा सराव केला आहे, तेवढेच थर लावावेत, याबाबत सूचना केल्या जातात. आयोजकांनाही गोविंदांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन केले जाते. असोसिएशनमधील मोठी मंडळे छोट्या मंडळांना सुरक्षेच्या साधनांचा कसा वापर करावा, याबाबत सहकार्य करतात, असे महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी सांगितले.
लहान मुलांचाच वापर का?
दहीहंडी स्पर्धा जिंकण्यासाठी उंच थर पटकन उभे करावे लागतात. हलक्या वजनाचे, चपळ खेळाडू मिळवण्याचे आव्हान मंडळांसमोर असते. सर्वात वरच्या थरावर हलके आणि लवचिक शरीराच्या व्यक्ती लागतात. लहान मुले वजनाने कमी असतात, त्यामुळे खालच्या थरावरील गोविंदांवर त्यांचा भार कमी होतो. लहान मुले चपळ असल्याने लवकर चढू-उतरू शकतात. काही पथके कायदेशीर नियमापासून अनभिज्ञ असल्याने देखील लहान मुलांचा पथकात समावेश करून घेतात.
सुरक्षा साधने खर्चिक
सेफ्टी हार्नेस, जॅकेट, हेल्मेट, संरक्षक जाळ्या, वरचा दोर, जाड गाद्या, एल्बो गार्ड, नी गार्ड आदी संरक्षण साधने वापराने आवश्यक असते. मात्र, यातील काही साधने अत्यंत महाग असल्याने गोविंदा पथके त्याचा वापर करत नाहीत. छोट्या पथकांना या साधनांची खरेदी परवडणारी नसल्याने ते यांचा वापर करत नाहीत. बाजारात चांगल्या दर्जाच्या सेफ्टी हार्नेसची किंमत साडेपाच हजारांपासून सुरु होते. वरचा दोर हा साधारण २५ हजार रुपयांपासून सुरु होतो. तसेच, जमिनीवर अंथरायच्या गाद्याही प्रचंड महाग आहेत.