मुंबई : अतिवृष्टी आणि महापुरात मृत्युमुखी पडलेल्या दुभत्या गायींना राष्ट्रीय आपत्ती निवारण मदत निधीच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार प्रति गाय ३७ हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे, शिवाय ही मदत फक्त तीन गायींसाठीच मिळणार आहे. तीनपेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला असल्यास कोणतीही मदत मिळणार नाही. त्यामुळे बाधित पशूपालक मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत.

अतिवृष्टी आणि महापुरामुळे सोलापूरसह मराठवाड्यातील हजारो जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे जनावरांचे गोठे पाण्याखाली गेल्यामुळे जनावरांचा बुडून मृत्यू झाला आहे. अनेक जनावरे वाहून गेली आहेत. दुभत्या गायी, म्हशी, शेळ्या- मेढ्यांसह कोबड्यांचाही मृत्यू झाल्यामुळे  पशूपालक मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत.

सध्या एनडीआरएफच्या निकषांनुसार बाधितांना आर्थिक मदत दिली जात आहे. पण, बाजारात दुधाळ म्हैस – गायींची ७० हजार ते दीड लाख इतकी आहे. मात्र, दुधाळ जनावरांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषांनुसार ३७,५०० रुपये, बैलांसाठी ३२,००० रु. मदत दिली जाते, तीही तीन जनावरांच्या मर्यादेत दिली जाणार आहे.

तीनपेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाल्यास कोणतीही भरपाई मिळणार नाही, त्यामुळे दूध उत्पादक पशूपालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) प्रदेश सरचिटणीस, आमदार रोहित पवार यांनी या बाबत समाज माध्यमांवर संदेश प्रसारित करून या प्रश्नाला वाचा फोडली आहे. शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले आहेत.

संपूर्ण गोठ्यातील जनावरे मरून पडली आहेत. तरीही सरकार जनावरांच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देताना दिसत नाही. वाहून गेलेल्या जनावरांचा पंचनामा करणे शक्य नाही, त्या ठिकाणी ग्रामसेवकाच्या पत्राच्या आधारे मदत द्यावी. दुधाळ जनावरांसाठी बाजार भावाप्रमाणे किमान एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.