रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ३० वर्षीय तरूणाला बिहारमधून अटक करण्यात आली होती. आरोपीने धमकी देताना धाक दाखवण्यासाठी पुलवामा व मुंबई दहशतवादी हल्ला आम्हीच घडवून आणल्याचा दावा केला होता. आरोपीने त्याच्या मोबाइलमधील सर्व माहिती डिलीट केल्याचे तपासणीत उघड झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेची मदत घेण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>विक्रोळी येथे तरण तलावात तरुणाचा मृतदेह सापडला ; पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल
सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयातील दूरध्वनीवर बुधवारी दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी व सायंकाळी ५ च्या सुमारास एका अज्ञात क्रमांकावरून दोन दूरध्वनी आले होते. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स रग्णालय उडवून देण्याची धमकी दिली. तसेच मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, आकाश अंबानी व अनंत अंबानी यांना ठार मारण्याची आणि अंबानी कुटुंबियांचे ‘अँटेलिया’ हे निवासस्थान उडवण्याची धमकी दिली. याप्रकरणी तक्रार करण्यात आल्याचे रिलायन्स समुहाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा >>> ‘पोडिअमवर मनोरंजन मैदान असूच शकत नाहीʼ; राष्ट्रीय हरित लवादाच्या स्पष्टीकरणाने खळबळ
रुग्णालय प्रशासनाने याची माहिती डी. बी. मार्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. याप्रकरणी तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली. त्यातील एका पथकाने बिहारमधील दरभंगा येथून राकेश मिश्रा (३०) या आरोपीला अटक केली. धमकी देताना धाक करण्यासाठी आरोपीने पुलवामा हल्ला आम्ही केला होता, मुंबई हल्लाही आम्ही घडवून आणला होता. पुलवामामध्ये कसे लोकांना उडवले, त्याप्रमाणे उडवून देऊन असा दावा केला आहे. याप्रकरणाच्या तक्रारीत ही बाब नमुद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय आरोपीकडून जप्त मोबाइलमधील सर्व माहिती डिलीट करण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेची मदत घेण्यात येणार आहे. तसेच पोलीस आरोपीविरोधात पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलम वाढवण्याची शक्यता आहे.रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात ऑगस्ट महिन्यातही धमकीचा दूरध्वनी करून प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन डी. बी. मार्ग पोलिसांनी वेगाने तपास करून दक्षिण मुंबईतून सराफ व्यावसायिकाला अटक केली होती.