मुंबईः खंडणीच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या एका आरोपीला बोरिवली पोलिसांनी अटक केली. विजयानंद  शिरोडकर असे या आरोपीचे नाव असून फेब्रुवारी महिन्यांत खंडणीचा गुन्हा दाखल होताच गेल्या दहा महिन्यांपासून तो पोलिसांचा समेमिरा चुकवून पळत होता.

याप्रकरणी तक्रार करणाऱ्या तक्रारदाराचा बोरिवलीतील जया सिनेमागृहासमोरील पदपथकावर कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्याच्याकडून विजयानंद दरमाह हप्ता घेत होता. आतापर्यंत त्यांनी त्याला ८५ हजार रुपये हप्ता दिला होता. पदपथावर व्यवसाय करायचा असेल तर हप्ता द्यावा लागेल. ज्यांनी हप्ता दिला त्यांना तो तिथे व्यवसाय करू देत होता, मात्र हप्ता देण्यास नकार देणाऱ्यांना तो व त्याचे सहकारी व्यवसाय करू देत नव्हते. त्यांना शिवीगाळ करून मारहाण करीत होते. त्यामुळे भीतीपोटी अनेक फेरीवाले त्याला खंडणीची रक्कम देत होते. तक्रारदाराने ऑक्टोबर २०२३ पासून त्याला हप्ता देण्यास बंद केले होते. त्यामुळे त्याला इलियास, कैलास, रुपेसिंग व अन्य एकाने ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तो विजयानंदला भेटायला गेला आणि त्याची आर्थिक परिस्थिती नसल्याचे सांगितले. यावेळी त्याने त्याला दोन दिवसांत तुझा निर्णय घेतो अशी धमकी दिली होती. त्याच्याकडून जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने तक्रारदाराने बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती.

हेही वाचा >>>आर्थर रोड कारागृहातील एका बराकमध्ये ५० ऐवजी २०० हून अधिक कैदी, कैद्यांच्या सुरक्षिततेबाबत उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तक्रारीनंतर पोलिसांनी खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत विजयानंद गेल्या दहा महिन्यांपासून फरार होता. तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी बोरिवली येथून त्याला अटक केली. या गुन्ह्यांत इलियास बेलीम, कैलास बाबर, रुपेसिंग व अन्य एकजण सहआरोपी आहे. ही टोळी फेरीवाल्यांना ठार मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी करीत होते. विजयानंद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध ३० हून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे समजते.