कुर्ला पूर्व रेल्वे स्थानकाजवळील फाटक परिसरात मंगळवारी सकाळी कुर्ला लोहमार्ग पोलिसांना एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी तपास करून पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली. गांजा सेवनावरून झालेल्या वादात तरूणाची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली.

हेही वाचा >>>उद्धव ठाकरेंची तोफ मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार; म्हणाले, “तुम्ही सभा लावा, मी…”

घाटकोपर परिसरात वास्तव्यास असलेल्या निखिल सावळा (२४) याचा मृतदेह मंगळवारी सकाळी कुर्ला पूर्व रेल्वे स्थानकाजवळील फाटक परिसरात आढळला होता. कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी या परिसरातील काही सीसी टीव्ही कॅमेरांतील चित्रण तपासले असता त्यामध्ये आरोपीची ओळख पटली. घाटकोपर परिसरात राहणारा आरोपी दीपक गिरी (२०) याचा काही दिवसांपूर्वी निखिल सोबत गांजा सेवनावरून वाद झाला होता. याचाच राग आरोपीच्या मनात होता.

हेही वाचा >>>उद्धव ठाकरेंची तोफ मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार; म्हणाले, “तुम्ही सभा लावा, मी…”

आरोपीने निखिलला गांजा सेवनासाठी मंगळवारी कुर्ला परिसरात बोलावले. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी आरोपीने चाकूने निखीलवर वार करून त्याची हत्या केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.